कोरोना काळात क्वारंटाईन असलेल्या सहकारी महिला डॉक्टरवर दोन सहकारी डॉक्टरांनी बलात्कार केल्याची घटना चेन्नईत घडली. ऑगस्टमध्ये घडलेल्या या घटनेप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.
ऑगस्ट महिन्यात कोरोनामुळे एक महिला डॉक्टर चेन्नईतील टी नगर येथील हॉटेलमध्ये क्वारंटाईन होती. त्यावेळी हा प्रकार घडला. संबधित महिला डॉक्टरने पोलिसांत तक्रार दिल्यानंतर संशयितांना अटक केली असून त्यांना दोन दिवसांची कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चेन्नईतील एका महिला डॉक्टरला ऑगस्ट महिन्यात एका हॉटेलमध्ये क्वारंटाइन केले होते. ती खोलीत एकटीच असताना तिचे दोन सहकारी डॉक्टर तिच्या खोलीत गेले. त्यांनी तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर ते निघून गेले. या घटनेमुळे संबधित महिला धक्क्यात होती. क्वारंटाईन कालावधी संपल्यानंतर ती दीर्घ रजेवर गेली होती.
ऑक्टोबर महिन्यात ती पुन्हा रुजू झाल्यानंतर तिने बुधवारी पोलिसांत तक्रार दिली. शहर पोलिस आयुक्तांकडे तक्रार दिल्यानंतर फ्लॉवर बाजार पोलिसांनी दोघांविरोधात आज गुन्हा दाखल केला आहे. ज्या हॉटेलमध्ये घटना घडली त्या हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. त्यात संबधित डॉक्टर मध्यरात्री महिला डॉक्टरच्या खोलीत शिरताना दिसतात.
ही घटना घडल्यानंतर संबधित महिला आपल्या पालकांकडे गेली होती. तिने याची माहिती पालकांनी दिली. त्यानंतर तिने तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला. सध्या महिला डॉक्टरचे समुपदेशन सुरू असून संशयितांकडे कसून चौकशी सुरू आहे.
हेही वाचा :