तीन कृषी कायदे रद्द : राजकीय पडझडीच्या धोक्यामुळेच निर्णय | पुढारी

तीन कृषी कायदे रद्द : राजकीय पडझडीच्या धोक्यामुळेच निर्णय

नवी दिल्‍ली : पुढारी ऑनलाईन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन कृषी कायदे रद्द  करण्याची घोषणा केल्यानंतर त्याचे विश्लेषण सुरू झाले आहे. हा राजकीय फायद्यातोट्याचा विचार करून निर्णय घेतला असल्याची टीका होत असून, आगामी राजकीय पडझडीच्या धोक्यामुळेच हा निर्णय घेतला आहे. तरीही हा शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय आहे, अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा करता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आगामी अधिवेशनात एमएसपी आणि शेतकऱ्यांच्या अन्य मुद्द्यांवर चर्चा करण्याचे आश्वासन दिले आहे. शेतकरी आंदोलनानंतर हा निर्णय घेतला असला तरी आगामी पंजाब आणि उत्तर प्रदेशातील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेतला असल्याची टीका होत आहे.

‘सत्याग्रहापुढे अंहकार झुकला’

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विट केले असून ते म्हणाले, देशाच्या अन्नदात्याने अहंकाराला झुकवले आहे. अन्यायाविरुद्ध लढा देऊन विजय मिळविल्याबद्दल अभिनंदन. जय हिंद, जय हिंद का किसान.

काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, ७०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांचे बलिदान दिल्यानंतर हे कायदे मागे घेतले आहेत. जर एवढ्या मोठ्या प्रमाणात बळी गेल्यानंतर सरकार जागे होणार असेल तर शेतकऱ्यांप्रति काय विचार केला जातो हे समजते. वर्षभर जे शेतकरी आणि सामान्य जनता नुकसान सहन करत होती त्याची जबाबदारी कुणाची?हा मुद्दा आम्ही संसदेत उचलणार.

तीन कृषी कायदे रद्द  : पराभव समोर दिसू लागल्याने निर्णय

काँग्रेसचे वरिष्ठ नेते के. सी वेणुगोपाल म्हणाले, हा शेतकऱ्यांचा मोठा विजय आहे. तर एनसीपी नेते नवाब मलिक म्हणाले की, पुढील पराभव समोर दिसू लागल्याने हा निर्णय घेतला आहे.

ऑल इंडिया किसान सभेचे महासचिव हन्नान मौला म्हणाले, मी या घोषणेचे स्वागत करतो. जोपर्यंत संसदेत घोषणा करत नाहीत तोपर्यंत आमचे प्रयत्न सुरू राहतील. एमएसपीसाठी आमचे आंदोलन सुरू राहील.

आपचे खासदार संजय सिंग म्हणाले, आगामी निवडणुकांतील पराभव समोर दिसू लागल्याने हे कायदे मागे घेतले आहेत.
राजदचे नेते मनोज झा म्हणाले, सरकारसाठी हा एक धडा आहे. आपण संख्याबळाच्या जोरावर कुठलाही निर्णय घेऊन आणि तो अंमलात आणू असे त्यांना वाटत असेल तर तो गैरसमज आहे. असे होऊ शकत नाही.

७०० शेतकऱ्यांच्या बलिदानानंतर यश

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, आज प्रकाश दिवस आहे. आजच्याच दिवशी ही खुशखबर मिळाली. तीन कृषी कायदे रद्द झाले मात्र, त्यासाठी ७०० शेतकऱ्यांनी बलिदान दिले. त्यांचे बलिदान देश लक्षात ठेवेल. त्यांनी जीवाची बाजी लावून हा लढा जिंकला. माझ्या देशाच्या शेतकऱ्यांना नमन.

हेही वाचा : 

Back to top button