नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : PM Modi ब्रिक्स परिषदेच्या तेराव्या शिखर परिषदेस ९ सप्टेंबरपासून (गुरुवार) प्रारंभ होत असून त्याचे अध्यक्षपद पंतप्रधान नरेंद्र मोदी भुषविणार आहेत.
या बैठकीला ब्राझीलचे अध्यक्ष जेर बोलेसनारो, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग, आणि दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सायरिल रामाफोसा उपस्थित राहणार आहेत.
भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, न्यू डेव्हलपमेंट बँकेचे अध्यक्ष मारकोस ट्रोयजो, ब्रिक्स व्यवसाय परिषदेचे अस्थायी अध्यक्ष ओंकार कंवर आणि ब्रिक्स महिला व्यवसाय आघाडीच्या अस्थायी अध्यक्ष डॉ. संगीता रेड्डी शिखर परिषदेदरम्यान नेत्यांना त्यांच्या क्षेत्राशी संबंधित त्याअंतर्गत या वर्षी पाठविलेल्या निकालांचे अहवाल सादर करतील.
पंतप्रधान मोदी हे दुसऱ्यांदा ब्रिक्स शिखर परिषदेचे अध्यक्ष आहेत. यापूर्वी २०१६ मध्ये त्यांनी गोवा ब्रिक्स शिखर परिषदेचे अध्यक्षपद भूषविले होते. या शिखर परिषदेचा `BRICS@15 : सातत्य, एकत्रीकरण आणि सहमतीसाठी आंतर-ब्रिक्स सहकार्य`हा विषय आहे.
आपल्या अध्याक्षतेच्या काळासाठी भारताने चार प्राधान्यक्षेत्रांची रूपरेषा मांडली होती. यात बहुक्षेत्रीय प्रणालीतील सुधारणा, दहशतवाद विरोध, एसडीजी शाश्वत विकास ध्येय साध्य करण्यासाठी डिजीटल तंत्रज्ञान साधनांचा वापर करणे आणि व्यक्तींमधील परस्पर संबंध दृढ करण्यासाठी एक्सचेंज प्रोग्रॅम यांचा समावेश आहे.
या क्षेत्रांव्यतिरिक्त कोरोना महारोगराईच्या प्रभावावर आणि सध्याच्या अन्य जागतिक समस्यांवर देखील विचारांची देवाणघेवाण हे नेते करतील.