फुटबॉल : ‘खेळातून आयुष्यभराच्या भाकरीसाठी प्रयत्न करा’ | पुढारी

फुटबॉल : 'खेळातून आयुष्यभराच्या भाकरीसाठी प्रयत्न करा'

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा: खेळाच्या माध्यमातून खेळाडूंनी आयुष्यभराच्या भाकरीसाठी प्रयत्न करणे काळाची गरज आहे. पेठा-पेठातील आणि संघांमधील मैदानातील ईर्ष्या खेळापूरती मर्यादित ठेवून कोल्हापूरचे फुटबॉलपटू घडविण्याबरोबरच त्यांच्या करिअरचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी जाणीवपूर्वक सर्व घटकांकडून प्रयत्न होणे अत्यावश्यक आहे, अशा भावना ज्येष्ठ फुटबॉलपटूंनी व्यक्त केल्या.

खेळमय वातावरण

आजी-माजी फुटबॉलपटूंचा स्नेहमेळावा सोमवारी (दि. ७) रोजी शिवाजीपेठ-संध्यामठ परिसरातील सभागृहात झाला. संपूर्ण सभागृहात कोल्हापूरातील विविध पेठांमधील तालीम संस्थांच्या फुटबॉलपटूंच्या जर्शी व त्यांचे ध्वज लावण्यात आले होते.

यासोबत कोल्हापूरची ‘गोल्डन गर्ल’ तेजस्विनी सावंत हिची नुकत्याच झालेल्या टोकिओ ऑलिम्पिक स्पर्धेतील जर्शी व १९ वर्षाखालील भारतीय फुटबॉल संघात निवड झालेला विश्व शिंदे या खेळाडूंच्या जर्शीही मध्यभागी लावण्यात आल्या होत्या. ऑलिम्पिकवीर पै. दिनकर शिंदे यांचे पणतू असणारे फुटबॉलपटू विश्व शिंदे याचा मान्यवरांच्या हस्ते सहकुटूंब विशेष सत्कारही करण्यात आला.

निधन झालेल्या खेळाडूंना श्रध्दांजली

फुटबॉल शेजारी मेणबत्ती प्रज्वलीत करून सन २०२०-२०२१ या वर्षात निधन झालेल्या खेळाडूंना श्रध्दांजली वाहण्यात आली. यात आप्पासाहेब वणिरे, राजाराम आतकिरे, निवासराव साळोखे, बाळासाहेब बोंद्रे, रावसाहेब सरनाईक, बाळासाहेब बुरटे, मधुकर तावडे, रणवीर चव्हाण, शब्बीर नाईकवडी, रमेश पाटील, संतोष गायकवाड (सर्व कोल्हापूर) आणि भरत कांबळे व भगवान कांबळे (मिरज) यांचा समावेश आहे.

खेळाडूंचे करिअर काळाची गरज

यावेळी बोलताना ‘केएसए’चे उपाध्यक्ष अरुण नरके यांनी, फुटबॉलमय वातावरण जपण्यासाठी असे उपक्रम पेठापेठांत सात्तत्याने व्हावे असे आवाहन केले. तसेच ज्येष्ठ खेळाडूंच्या गुडघ्यावरील व्याधींवर नरके फौंडेशनच्या माध्यमातून प्रयत्न करण्याची घोषणा केली.

सचिव माणिक मंडलिक यांनी ‘केएसए’च्या माध्यमातून ज्येष्ठ फुटबॉलपटूंचा मेळावा आयोजनासाठी चिप पेट्रन शाहू महाराज व अध्यक्ष मालोजीराजे यांच्याकडे पाठपूरावा करणार असल्याचे सांगितले. तसेच फुटबॉल हंगाम लवकरात- लवकर सुरु करण्यासाठी ‘केएसए’ पाठपूरावा करत असल्याचेही सांगितले.

पीटीएमचे शरद माळी यांनी खेळाडूंच्या करिअरसाठी व्यापक प्रयत्न व्हावे असे आवाहन केले. लालासाहेब गायकवाड यांनी ज्येष्ठ खेळाडूंनी समाजातील एक घटक म्हणून आपले आयुष्य खर्ची खातल्याचे सांगितले.

अकबर मकानदार यांनी फुटबॉलमधील करिअरसाठी कोल्हापूरच्या खेळाडूंनी किमान एक वरिष्ठ राष्ट्रीय व संतोष ट्रॉफी सारख्या स्पर्धा खेळणे अत्यावश्यक असल्याचे सांगितले. सुरेश जरग व शशिकांत साबळे यांनीही फुटबॉल विषयीच्या आठवणी सांगितल्या.

स्नेह मेळाव्यास चेतन नरके, शिवतेज खराडे, ज्येष्ठ फुटबॉलपटू बाळासाहेब निचिते, अभिजीत वणिरे, विजय शिंदे, उदय आतकिरे, सुहास साळोखे, सुदेश मगदूम, प्रकाश रेडेकर, अकबर मकानदार, दत्तात्रय मंडलिक, भाऊ घोडके, मनोज जाधव, सतिश चौगुले यांच्यासह आजी-माजी फुटबॉलपटू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्वागत-प्रास्ताविक संयोजक दिलीप माने यांनी केले. सुत्रसंचालन मिलींद यादव यांनी तर संयोजन सतिश सूर्यवंशी, विजय माने, पंप्पू सूर्यवंशी व सहकाऱ्यांनी केले. अरुण नरके फौंडेशनच्या सहकार्याने हा मेळावा झाला.

हेही वाचलंत का?

Back to top button