नागपूर : शहरातील तलावांमध्ये गणेश मूर्ती विसर्जनास प्रतिबंध

नागपूर : शहरातील तलावांमध्ये गणेश मूर्ती विसर्जनास प्रतिबंध
Published on
Updated on

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : नागपूर शहरामध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा यादृष्टीने नागपूर महानगपालिकेद्वारे महत्वपूर्ण आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. मनपाच्या आदेशानुसार शहरातील सर्व तलावांमध्ये गणेश मूर्ती विसर्जनास प्रतिबंध लावण्यात आले असून मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच करता येणार आहे.

याशिवाय पीओपी मूर्तींच्या खरेदी व विक्रीवर बंदी असूनही त्याची विक्री करण्यात आल्यास संबंधित विक्रेत्यावर जप्तीची दंडात्मक कारवाईसुद्धा केली जाईल. यासंदर्भात मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त राजेश भगत यांनी आदेश निर्गमित केले. गणेशोत्सवाच्या तयारी संदर्भात झालेल्या बैठकीमध्ये महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिलेल्या निर्देशान्वये मनपा प्रशासनाद्वारे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.

पर्यावरण पूरक गणेशोत्सव

शहरात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा यादृष्टीने मनपा प्रशासनाद्वारे तयारी सुरू आहे. त्यादृष्टीने प्रत्येक झोनमध्ये गणेश मूर्तींच्या विसर्जनाकरिता कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात येणार आहे. याशिवाय फिरते कृत्रिम टँकही झोनद्वारे नागरिकांच्या सुविधेसाठी असणार आहेत. सार्वजनिक गणेशोत्सवस्थळी व घरगुती गणेश मूर्तींच्या निर्माल्य संकलानासाठी स्वतंत्र वाहनांची व्यवस्था कचरा संकलन एजन्सीद्वारे करण्यात येणार आहे.

पीओपी मूर्तींच्या प्रतिबंधासह श्रीगणेशाच्या सजावटीकरिता प्लॉस्टिक आणि थर्मोकॉलच्या वापरासुद्धा पूर्णत: प्रतिबंध लावण्यात आले आहे. तसेच नागरिकांनी बंदी असलेल्या कुठल्याही वस्तूंचा सजावटींकरिता वापर करू नये, शक्यतो घरगुती गणेशाचे विसर्जन घरीच करावे, असे आवाहनही मनपातर्फे करण्यात आले आहे. ज्या झोनमध्ये सर्वाधिक घरगुती विसर्जन केले जाईल, अशा तीन झोनची निवड करून त्यांना मनपाद्वारे पुरस्कृत केले जाईल.

मूर्ती विक्रीची परवानगी

गणेशोत्सवासंदर्भात मनपा प्रशासनाने जारी केलेल्या आदेशानुसार शहरातील मूर्ती विक्रेत्यांनी संबंधित झोनमधून मूर्ती विक्रीची परवानगी घेणे अनिवार्य असून विक्रेत्यांद्वारे परवानगी घेण्यात आली अथवा नाही याची झोनमधील उपद्रव शोध पथकाद्वारे शहानिशा करण्यात यावी, असेही आदेश मनपाद्वारे सर्व झोनला देण्यात आले आहेत.

पीओपी विरुद्ध सर्वाधिक कारवाई करणाऱ्या झोनला पारितोषिक

पीओपी मूर्तींची विक्री, खरेदी आणि आयात यावर कायद्याने बंदी आणली असल्यामुळे अशा मूर्तींची खरेदी व विक्री करणे गुन्हा ठरणार आहे. त्यामुळे पीओपी मूर्तींची कुठेही स्थापना होऊ नये व कायद्याचे उल्लंघन होऊ नये याकडे मनपातर्फे विशेष लक्ष देण्यात येत आहे. कठोर कायद्यानंतरही नागरिकांची फसवणूक करून त्यांना पीओपी मूर्तीची विक्री केली जाऊ नये यासाठी मनपाचे उपद्रव पथक तैनात आहे. ज्या झोनमध्ये पीओपी मूर्तींच्या विक्रीसंदर्भात सर्वाधिक कारवाई करण्यात येईल, त्या झोनला मनपातर्फे पारितोषिक देण्यात येणार आहेत.

जनजागृती करणाऱ्या गणेश मंडळांनाही पुरस्कार

पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा यादृष्टीने मनपाद्वारे महत्वपूर्ण उपक्रम राबविण्यात येत असून त्याअंतर्गत झोनस्तरावर स्पर्धा घेण्यात येणार आहेत. झोनमधील होणाऱ्या पीओपी मूर्तींच्या कारवाई सोबतच सार्वजनिक गणेश मंडळाद्वारे जबाबदारीने गणेशोत्सव साजरा करून त्यामाध्यमातून डेंग्यू आजाराबाबत व त्याच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांसंदर्भात जनजागृती करण्यात आल्यास त्यांनाही मनपाद्वारे पारितोषिक प्रदान करण्यात येणार आहे.

पहा व्हिडीओ : कोल्हापुरातील पांडवकालीन सातेरी महादेव मंदीर

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news