मंत्री नबाब मलिक म्‍हणाले, आरोप करण्याआधी आयपीएस अधिकारी फडणवीसांना भेटतात | पुढारी

मंत्री नबाब मलिक म्‍हणाले, आरोप करण्याआधी आयपीएस अधिकारी फडणवीसांना भेटतात

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : भाजपकडून विरोधी पक्षांचे सरकार असलेल्या राज्यात सरकार बदनाम करण्याचा डाव आहे. मंत्र्यांवर आरोप करणाऱ्या आयएएस,आयपीएस अधिकारी यांच्‍या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह दिल्लीतील काही मंत्र्यांबरोबर बैठका झाल्याची माहीती आमच्याकडे आहे, असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. याेग्‍यवेळी आम्ही अधिकाऱ्यांची नावे जाहीर करू, असेही त्यांनी स्‍पष्‍ट केले.

संजय राऊत, भावना गवळी, अनिल परब, अनिल देशमुख या आमच्या महाविकास आघाडीतील नेत्यांना बदनाम करण्यासाठी आरोप झाले. विशेषतः परमवीर सिंग, रश्मी शुक्ला या आयपीएस अधिकाऱ्यांनी आघाडीच्या मंत्र्यांवर आरोप केले होते.

आता हे अधिकारी आरोप करण्याआधी फडणवीस यांना भेटल्याचा दावा मलिक यांनी केला.

या सरकारला बदनाम करण्यासाठी कटकारस्थान रचले गेले असल्याचे मंत्री नवाब मलिक म्हटले आहे.

पश्‍चिम बंगालमध्ये केंद्रीय यंत्रणांचा दुरूपयोग करून तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांना त्रास दिला जात असल्याने अनेक नेते आता भाजपात प्रवेश करण्याच्या वाटेवर आहेत. महाराष्ट्रातही असेच कारस्थान रचले गेले आहे,  असा आरोपही मलिक यांनी केला.

आम्ही या सरकारचा भ्रष्टाचार आणि घोटाळे बाहेर काढणारच, असे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी म्हटले हाेते. यावर बाेलताना किरीट सोमय्या यांचा हा आरोप हास्यास्पद असल्याची टीकाही मलिक यांनी केली.

हेही वाचलं का? 

Back to top button