Hinjawadi Accident Survivor Testimony Pudhari
पिंपरी चिंचवड

Hinjawadi Accident Survivor Testimony: "बस माझ्या दोन फुटांवरून निघून गेली...अन मी थोडक्यात बचावलो!" हिंजवडी अपघाताच्या साक्षीदाराचा थरार

बसचालक दारूच्या नशेत, अपघातानंतर महिला कर्मचारी पळून गेल्याचा आरोप; चालकासह मालक आणि सुरक्षा तपासणी करणाऱ्यावरही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा.

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी : हिंजवडी आयटी पार्कमधील पंचरत्न चौकात सोमवारी (दि. 1) सायंकाळी घडलेल्या भीषण अपघातात तीन भावंडं जागीच ठार झाली. या संपूर्ण घटनेचा प्रत्यक्ष साक्षीदार ठरलेले सार्थक गेरांगे हे अद्यापही त्या प्रसंगातून सावरू शकलेले नाहीत. मी थोडक्यात बचावलोः मात्र, त्या मुलांना वाचवू शकलो नाही,” असे त्यांनी थरथरत्या आवाजात ‌‘पुढारी‌’शी बोलताना सांगितले.

सार्थक आपल्या व्यवसायाच्या कामानिमित्त रस्ता ओलांडत होते. ते म्हणाले की, मी रस्त्याच्या मध्यावर आलो आणि अचानक एक कंपनीची बस भरधाव माझ्याकडे झेपावताना दिसली. आवाज इतका मोठा की सेकंदभर मला काही सुचले नाही. बस माझ्या अगदी दोन ते तीन फुटांवरून निघून गेली. मी कसाबसा बाजूला झालो. माझा जीव वाचलाः मात्र, बस पुढच्याच क्षणी थेट मुलांच्या अंगावर चढली.

अर्चना, सूरज, प्रिया यांना मी मागील सात ते आठ वर्षांपासून पाहत होतो. डोळ्यासमोर वाढलेल्या शांत, निरागस, खेळकर स्वभावाच्या या मुलांचा दररोज शाळा ते घर असा दिनक्रम होता. सोमवारी मोठी बहीण प्रिया त्यांना शाळेतून घरी आणत होती. माझ्या डोळ्यांसमोर त्या तिघांना बसने चिरडले. जिवंतपणी एखाद्याला एवढे भयानक दृश्य पाहावे लागेल, असे कधी वाटले नव्हते.

रक्ताच्या चिरकांड्या अन्‌‍ मांसाचा चिखल

बसचा आवाज आल्यानंतर मी धावत गेलो, मुलांना उचलण्याचा प्रयत्न केला. मात्र, उचलायला काहीच उरले नव्हते. मुलांच्या पाठीवरील दप्तर रस्त्यावर पडले होते. पुस्तके अस्ताव्यस्त पडली होती. चिमुकल्या शरीरात जीव राहिला नव्हता. रस्त्यावर उडालेल्या रक्ताच्या चिरकांड्या आणि मांसाचा चिखल पाहून मी पूर्ण असहाय्य झालो होतो.

अपघातानंतर संतापाची लाट

बसचालक हा मद्यधुंद अवस्थेत असल्याचा प्रत्यक्षदर्शींचा आरोप आहे. अपघात होताच बसमधील महिला कर्मचारी घटनास्थळावरून पळून गेल्याची माहितीही समोर आली आहे. हिंजवडीतील नागरिकांनी कठोर कारवाईची मागणी पोलिसांकडे केली आहे.

एकुलता एक मुलगा हरपला

दोन मुलींसोबत घरातील एकुलता एक मुलगा हरवल्याने प्रसाद कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घरातील सर्वांना मानसिक धक्का बसला असून कोणीही बोलण्याच्या स्थितीत नाही. अर्चना प्रसाद (वय 9), सूरज प्रसाद (वय 6), प्रिया प्रसाद (वय 16) अशी मृत्यू झालेल्या भावंडांची नावे आहेत. यासह अविनाश हरिदास चव्हाण (वय 26), विमल ओझरकर हे जखमी झाले आहेत.

रात्रभर झोपलो नाही

त्या मुलांचे चेहऱ्यांवरील निरागस भाव अजूनही माझ्या डोळ्यासमोर आहेत. मी रात्रभर झोपलो नाही. डोळे मिटले की ते दृश्य पुन्हा उभे राहते. मी वाचलो, पण त्यांना वाचवता आले नाहीः ही असहाय्यता आयुष्यभर सोबत राहील.

चौघांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

बसचालकासह दोघांना पोलिस कोठडी

पिंपरी : दारूच्या नशेत चालकाने बस भरधाव चालवून तिघांना चिरडले. यामध्ये तिघांचा मृत्यू झाला. तर, एका महिलेसह तिघे जखमी झाले. ही घटना सोमवारी (दि. 1) सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास हिंजवडी येथील पंचरत्न चौक येथे घडली. याप्रकरणी बसचालकासह दोघांना मुळशी न्यायालयात हजर केले असता गुरुवारपर्यंत (दि. 4 डिसेंबर) पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

बसचालक नागनाथ राजाभाऊ गुजर (33, रा. गौरी पार्किंग, चक्रपाणी रोड, भोसरी, मूळ रा. धाराशिव), सबवेंडर व व्यवस्थापक भाऊसाहेब रोहिदास घोमल (48, रा. चिंचवड, मूळ रा. अहिल्यानगर) अशी पोलिस कोठडी सुनावण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांच्यासह मैत्रेय ट्रॅव्हल्सचे मालक, ड्रायव्हरची सुरक्षा तपासणी करण्याची जबाबदारी असलेली व्यक्ती यांच्या विरोधातही पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी स्वप्नील पांडुरंग जांभुळकर (24, रा. पंचरत्न चौक, हिंजवडी) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

प्रिया देवेंद्र प्रसाद (वय 16), आर्ची देवेंद्र प्रसाद (वय 8) या दोन बहिणींसह त्यांचा भाऊ सूरज देवेंद्र प्रसाद (वय 6) या तिघांचा या अपघातात मृत्यू झाला. दुचाकीस्वार अविनाश हरिदास चव्हाण (वय 26) हे गंभीर जखमी झाले. नूर आलम (वय 26) आणि विमल राजू ओझरकर (वय 40) हे दोघेही यामध्ये जखमी झाले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बसचालक नागनाथ गुजर याने दारूच्या नशेत मैत्रेय ट्रॅव्हल्सची एमएच 14 एलएल 7233 या क्रमांकाची बस हिंजवडी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडून वाकड पुलाच्या दिशेने भरधाव घेऊन जात होता. त्या वेळी पंचरत्न चौकात दुचाकीस्वार अविनाश चव्हाण यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यानंतर बसने पदपथावरील पादचारी प्रिया प्रसाद व आर्ची प्रसाद या दोन बहिणींसह त्यांचा भाऊ सूरज प्रसाद यांना जोरदार धडक दिली. यात आर्ची आणि सूरज यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच, नूर आलम आणि फिर्यादी स्वप्नील जांभुळकर यांची आत्या विमल ओझरकर यांनाही बसने धडक दिली. बसने पदपथ, इलेक्ट्रिक डीपी व होर्डिंगचेही नुकसान केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. पोलिस उपनिरीक्षक विकास ताकतोडे तपास करीत आहेत.

चालकाची सुरक्षा तपासणी करणाऱ्यावरही गुन्हा

वाहनमालक व देखरेख करणारे अधिकारी यांनी बसचालक मद्यधुंद असल्यास अपघात होऊ शकतो आणि लोकांचा मृत्यू होऊ शकतो याची माहिती असताना त्यांनी बसचालकाची तपासणी न करता वाहन चालविण्यास दिल्याबद्दल जबाबदारी निश्चित केली आहे. त्यानुसार, मैत्रेय ट्रॅव्हल्सचे मालक, सबवेंडर व व्यवस्थापक तसेच ड्रायव्हरची सुरक्षा तपासणी करण्याची जबाबदारी असलेल्या व्यक्तीच्या विरोधातदेखील याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT