

पुणे : टीईटीसंदर्भातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर पुनर्विचार याचिका दाखल करावी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करावी आदी प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील सर्व शाळा शुक्रवारी (दि. 5) बंद करून सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर शिक्षक व शिक्षकेतर संघटना समन्वय समितीच्या वतीने मोर्चा काढला जाणार आहे, अशी माहिती समितीचे समन्वयक शिवाजी खांडेकर आणि सचिन डिंबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
खांडेकर म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या टीईटीविषयक अनिवार्यतेच्या निर्णयास अनुसरून प्राथमिक शिक्षकांना संरक्षण देण्यासाठी पुनर्विचार याचिका दाखल करण्यास होत असलेली अनावश्यक विलंब प्रक्रिया, तसेच शिक्षण विभागाकडून निकालाचा चुकीचा अर्थ घेऊन सुरू असलेली कार्यवाही यामुळे राज्यातील शिक्षकवर्गामध्ये तीव असंतोष निर्माण झाला आहे.
त्यामुळे राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, मुख्याध्यापक, संस्थाचालक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांच्या विविध संघटनांचा समावेश असलेल्या शिक्षक व शिक्षकेतर संघटना समन्वय समितीच्या बैठकीत 5 डिसेंबर रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.