

पिंपरी : हिंजवडी आयटी पार्क परिसरात सोमवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात दोन चिमुकल्यांचा जागीच मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. पंचरत्न चौकात कंपनीचे कर्मचारी वाहतुक करणाऱ्या बसने पादचारी नागरिकांना जोरदार धडक दिल्याने हा हृदयद्रावक प्रकार घडला. अपघातानंतर परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.
अर्चना देवा प्रसाद (वय ८) आणि तिचा भाऊ सुरज देवा प्रसाद (वय ८) यांचा जागीच मृत्यू झाला. तर, प्रिया देवा प्रसाद (वय १६), विमल ओझरकर (वय ४०) आणि एक अन्य दुचाकीस्वार जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जवळील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास पंचरत्न चौकातून नागरिक नेहमीप्रमाणे पायी जात होते. त्याचवेळी हिंजवडी आयटी हबमधील एका कंपनीची कर्मचारी वाहतूक बस भरधाव वेगात चौकातून जात होती. बसचालकाचा ताबा सुटल्याने बसने पादचारींना चिरडले. यामध्ये बहीण भावंडांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच हिंजवडी पोलीस आणि वरिष्ठ अधिकारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले आहेत. अपघातामुळे आयटी पार्क परिसरातील वाहतूक ठप्प झाली आहे. वाकड वाहतूक शाखा आणि हिंजवडी वाहतूक विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू घेतले.