

पिंपरी : चुकीच्या पद्धतीने प्रभागनिहाय मतदार यादी तयार केल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे मोठ्या संख्येने हरकती व सूचना दाखल करण्यात येत आहेत. सोमवारी (दि. 1) एकूण 832 हरकती नोंदविण्यात आल्या. आजअखेरपर्यंत तब्बल 6 हजार 887 हरकती महापालिकेस प्राप्त झाल्या आहेत. दरम्यान, हरकती व सूचना दाखल करण्यासाठी शेवटचे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत.
महापालिकेने पिंपरी, चिंचवड, भोसरी व भोर विधानसभेची मतदार यादी फोडून 1 ते 32 प्रभागांची प्रारूप मतदार यादी 20 नोव्हेंबरला प्रसिद्ध केली आहे. त्या यादीत असंख्य चुका आहेत. एका प्रभागातील मतदारांची नावे तसेच, यादी भाग दुसऱ्या प्रभागात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. काही माजी नगरसेवक तसेच, निवडणूक लढणाऱ्यांची नावे गायब झाली आहेत. महापालिका कर्मचाऱ्यांच्या चुकारपणामुळे मतदार यादीचा घोळ होऊन गोंधळ उडाला आहे. त्यामुळे राजकीय पक्ष, पदाधिकारी, माजी नगरसेवक, इच्छुक व नागरिकांकडून तक्रारी, हरकती व सूचना नोंदविल्या जात आहेत.
सर्व आठ क्षेत्रीय कार्यालय व मतदार यादी कक्षाकडे सोमवारी (दि. 1) एका दिवसात एकूण 832 हरकती दाखल करण्यात आल्या आहेत. आज एका दिवसात क क्षेत्रीय कार्यालयात सर्वांधिक 240 हरकती दाखल करण्यात आल्या आहेत. तर, 20 नोव्हेंबर ते आजअखेर तब्बल 6 हजार 887 हरकती, सूचना व आक्षेप नोंदविण्यात आले आहेत. क क्षेत्रीय कार्यालयात सर्वांधिक 1 हजार 729 हरकती नोंदविण्यात आले आहेत. अ क्षेत्रीय कार्यालयात 1 हजार 391 हरकती आणि फ क्षेत्रीय कार्यालयात 1 हजार 15 प्राप्त झाल्या आहेत. ग क्षेत्रीय कार्यालयात 855, ह क्षेत्रीय कार्यालयात 558, ड क्षेत्रीय कार्यालयात 548, ब क्षेत्रीय कार्यालयात 481 आणि ई क्षेत्रीय कार्यालयात 234 हरकती दाखल करण्यात आल्या आहेत.
यादीत दुबार नावे असल्याच्या ग क्षेत्रीय कार्यालयात 14, क क्षेत्रीय कार्यालयात 3 आणि अ क्षेत्रीय कार्यालयात 1 तक्रार अशा एकूण 18 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. महापालिका प्रशासनाने सुमोटो 58 हरकती दाखल करून घेतल्या आहेत. त्यातील सर्वांधिक 26 तक्रारी या क क्षेत्रीय कार्यालयातील आहेत. दरम्यान, बुधवारपर्यंत (दि. 3) हरकती व सूचना दाखल करण्याची मुदत आहे. गांधीनगर, पिंपरी येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृह तसेच, सर्व आठ क्षेत्रीय कार्यालयात हरकती व सूचना कार्यालयीन वेळेत लेखी स्वरुपात स्वीकारण्यात येत आहेत.
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठी एकूण 128 जागांसाठी दुरुस्तीसह आरक्षण सोडत 17 नोव्हेंबरला जाहीर करण्यात आली. त्यावर एकूण 72 हरकती महापालिकेच्या निवडणूक विभागास प्राप्त झाल्या आहेत. त्या हरकतींवर आयुक्त तथा प्रशासक श्रावण हर्डीकर यांनी अंतिम निर्णय घेतला आहे. प्रभाग क्रमांक 19 आणि 30 मधील जागांचे आरक्षण बदलले की आहे की तसेच राहिले? या संदर्भात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
महापालिका प्रशासनाकडून पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात 11 नोव्हेंबरला सर्वांसमोर जाहीर आरक्षण सोडत काढण्यात आली. मात्र, राज्य निवडणूक आयोगाच्या दुरुस्तीनंतर आरक्षणाची सुधारित यादी 17 नोव्हेंबरला प्रसिद्ध करण्यात आली. त्यात श्रीधरनगर, भाटनगर, पिंपरी भाजी मंडई प्रभाग क्रमांक 19 आणि दापोडी, फुगेवाडी, कासारवाडी प्रभाग क्रमांक 30 मधील प्रत्येकी दोन जागांच्या आरक्षणात बदल करण्यात आले. त्या दिवसापासून 24 नोव्हेंबरपर्यंत आरक्षण सोडतीच्या जागांबाबत हरकती व सूचना स्वीकारण्यात आल्या.
आरक्षणाची जाहीर सोडत प्रकिया राबविल्यानंतर प्रभागातील जागेत बदल केल्याने दापोडी, फुगेवाडी, कासारवाडी प्रभाग क्रमांक 30 बाबत सर्वांधिक हरकती दाखल करण्यात आल्या आहेत. मुदतीमध्ये एकूण 72 हरकती दाखल करण्यात आल्या. त्यावर महापालिकेचे आयुक्त तथा निवडणूक आधिकारी श्रावण हर्डीकर हे निर्णय घेणार आहे. ते प्रभाग क्रमांक 19 व 30 मधील जागांमध्ये बदल करणार की, त्या चार जागा आहे तशाच ठेवणार? यासंदर्भात उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान, आरक्षण सोडतीच्या जागेची अंतिम यादी मंगळवारी (दि. 2) प्रसिद्ध केली जाणार आहे. तसेच, त्याची अंतिम अधिसूचना प्रसिद्ध केली जाणार आहे.