

पिंपरी : महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने जास्त जागा दिल्या तर, त्यांच्यासोबत जायचे. नाही तर महायुतीतील अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर युती करायची आहे, असा सल्ला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना दिला आहे.
पिंपरी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकामागील मैदानात आरपीआय पिंपरी चिंचवड शहर शाखेच्या वतीने विजयी संकल्प मेळावा झाला. सभेला संबोधित करताना ते बोलत होते.
या वेळी पक्षाचे शहराध्यक्ष कुणाल वाव्हळकर, महिला प्रदेशाध्यक्षा चंद्रकांता सोनकांबळे, प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब भागवत, परशुराम वाडेकर, महिला शहराध्यक्षा कमल कांबळे, युवक शहराध्यक्ष धम्मरत्न गायकवाड, कार्याध्यक्ष योगेश भोसले, संघटक सचिव स्वप्निल कसबे, सम्राट जकाते, दयानंद वाघमारे, सुंदर कांबळे, सुरेश निकाळजे, अजित शेख, ख्वाजा शेख, अश्विन खुडे, अक्षय धनगव उपस्थित होते.
रामदास आठवले म्हणाले, की पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत भाजपाने समाधानकारक जागा सन्मानाने दिल्यास त्यांच्यासोबत जायचे. तसे न झाल्यास अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर युती करायची आहे. या निवडणुकीत आरपीआयची युती भाजप किंवा राष्ट्रवादी काँग्रेससोबतच होणार आहे. आरपीआयची युती शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेस पक्षाबरोबर होणार नाही. दरम्यान, आरपीआयने भाजपकडे शहरातील 15 जागांची मागणी केली आहे. तसेच, अनुसूचित जातीच्या (एससी) जागांवर सक्षम उमेदवार तयार ठेवले आहेत. निवडणुकीसाठी कामाला लागा, प्रभागात जनसंपर्क वाढावा, असा सल्ला त्यांनी इच्छुकांना दिला.
आपल्या तरुणांनी दहा-बारा हजारांच्या नोकरीच्या मागे न पळता, छोटा-मोठा उद्योग, धंदा सुरू करावा. अनेकांनी विविध महामंडळाकडून कर्ज घेऊन मुला-मुलींची लग्ने केली. असे न करता ते ती रक्कम धंद्यात लावली पाहिजे. आपल्याला नोकर नाही तर, मालक व्हायचे आहे, असा सल्ला त्यांनी युवकांना दिला.