राष्ट्रीय

कोरोना काळात महिलांचे स्वयंसहाय्यता समूह माध्यमातील काम अभूतपूर्व : पंतप्रधान मोदी

backup backup

नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा : कोरोना संकटकाळात महिलांनी स्वयंसहाय्यता समूह माध्यमातून केलेले काम अभूतपूर्व असल्याचे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (दि.१२) 'आत्मनिर्भर महिला शक्ती संवाद' कार्यक्रमात बोलताना काढले. पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी ४ लाख महिला स्वयंसहाय्यता समूह साठी १६२५ कोटी रुपयांचा निधी जारी करण्यात आला.

कोरोना संकटकाळात मास्क, सॅनिटायझर बनवायचे काम असेल, गरजू लोकांपर्यंत जेवण पोहोचवायचे असेल अथवा जनजागृती असेल, प्रत्येक कामात महिलांनी हिरीरीने सहभाग घेतला होता. महिलांचे हे काम अतुलनीय असल्याचे सांगून मोदी म्हणाले की, जेव्हा आमचे सरकार केंद्रात सत्तेत आले तेव्हा लाखो महिला अशा होत्या की ज्यांचे बँक खाते नव्हते.

अशा महिलांसाठी जनधन योजना सुरू करून महिलांना बँकिंग व्यवस्थेशी जोडण्याचे काम सरकारने केले. महिला स्वयंसहाय्यतासमूह विनातारण कर्ज देण्यात आले. महिलांच्या उद्यमशीलतेची व्याप्ती वाढविण्यासाठी आत्मनिर्भर भारत संकल्पनेसह आवश्यक ती मदत केली जात आहे.

दीनदयाल अंत्योदय योजना- राष्ट्रीय ग्रामीण आजीविका मोहिमेशी जोडल्या गेलेल्या महिलांशी मोदी यांनी याप्रसंगी संवाद साधला. फूड प्रोसेसिंग उद्योग, महिला शेतकरी उत्पादक संघ तसेच इतर स्वयंसहायता गटांना सोळाशे कोटींपेक्षा जास्त रक्कम आज दिली जात आहे, असे सांगून मोदी म्हणाले की, देशात निर्मिती असलेल्या खेळण्यांना सरकार प्रोत्साहन देत आहे. यासाठी मदत केली जात आहे.

खासकरून आदिवासी भागातील महिला या उद्योगात गुंतलेल्या आहेत. महिला स्वयंसहाय्यतासमूहांना या क्षेत्रात मोठी संधी आहे.

सिंगल यूज प्लॅस्टिक मुक्तीचा कार्यक्रम सध्या राबविला जात आहे. सेल्फ हेल्प ग्रुप्सची यात दुहेरी भूमिका आहे.

महिलांना सिंगल यूज़ प्लॅस्टिकचे दुष्परिणाम लोकांना सांगायचे आहेतच यासाठी विकल्प तयार करण्याची जबाबदारी देखील महिलांवर आहे.

देशात ७० लाख स्वयं सहाय्यता समूह कार्यरत

देशभरात सध्या ७० लाख स्वयं सहाय्यता समूह कार्यरत आहेत. याच्याशी सुमारे ८ कोटी महिला जोडल्या गेलेल्या आहेत. गेल्या सहा ते सात वर्षात स्वयं सहाय्यता समूहांची संख्या तीनपटीने वाढली आहे, असे सांगत मोदी म्हणाले की, बदललेल्या भारतात महिला-मुलींना पुढे जाण्यासाठी संधी वाढल्या आहेत.

घर, शौचालय, वीज, पाणी आदी सुविधा महिलांपर्यंत पोहोचवल्या जात आहेत. महिला-मुलींचे शिक्षण, आरोग्य, पोषण, लसीकरण आणि अन्य आवश्यक गोष्टींवर केंद्र सरकारने लक्ष दिलेले आहे,असे पंतप्रधान माेदी म्‍हणाले.

हे ही वाचा 

 पाहा व्‍हिडीओ : पुण्याच्या निकीताने केला भरतनाट्यममध्ये वर्ल्ड रेकॉर्ड

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT