रोजच्या प्रमाणबद्ध आहाराने शरीराची ऊर्जेची गरज पूर्ण होत असते. अर्थात, संतुलित ऊर्जा शरीराला फायदेशीर असते; मात्र ती असंतुलित झाल्यास त्याचे दुष्परिणामच अधिक होतात. अतिखाणे किंवा कमी प्रमाणातील खाणे या दोन्हींमुळे शरीराची ही ऊर्जा बिघडू शकते.
कित्येक लोक शरीराच्या ऊर्जेची ही गरज समजून घेऊ शकत नाहीत आणि उठसूठ खात राहतात; पण अतिखाण्याच्या सवयींमुळे वजनवृद्धीबरोबरच इतरही काही आजार होऊ शकतात.
अतिखाण्याची सवय किंवा समस्या ही मानसिक आरोग्याशी संबंधित आहे. खाणे आणि अतिखाणे यात फरक असतो. जेव्हा शरीरातील ऊर्जा कमी होते तेव्हा शरीराकडून भूक लागण्याचे संकेत मिळतात आणि मग खाण्याची आवश्यकता भासते.
आपले पोट भरलेले असेल आणि शरीरात पुरेशी ऊर्जा असेल, तरीही जेवण पाहिल्यावर, वास घेतल्यावर ते सेवन करण्याविषयी विचार करून जेव्हा आपल्याला मेंदूकडून ते खाण्याच्या सूचना मिळतात तेव्हा ते अतिखाणे होते. अतिखाणे हे एक प्रकारचे व्यसनच आहे.
शरीराला ऊर्जेची गरज नसताना फक्त पदार्थ पाहिला की, ती खाण्याची इच्छा होते. अतिखाणे ही समस्या मानसिक त्रासातून निर्माण होते. जेव्हा आपल्याला राग येतो, एकटेपणा वाटतो आणि औदासिन्य येते तेव्हा आपल्याला अतिखाण्याची इच्छा निर्माण होते.
अतिखाण्याचे व्यसन सोडवणे कठीणच असते. कारण, खाल्ल्यामुळे शरीरातील उल्हासित वाटण्यास कारणीभूत होणारी संप्रेरके स्रवण्यास सुरुवात होते.
त्यामुळे आपल्या छान वाटते; मात्र अतिखाण्याच्या व्यसनाची भविष्यात खूप किंमत मोजावी लागते. अनेक आजारांनी शरीरात घर करायला सुरुवात केलेली असते.
आहार सेवन केल्यानंतर शरीराकडून त्याचे व्यवस्थित पचन झाल्यामुळे जी ऊर्जा शरीराला मिळू शकते अशा अन्नाला पोषक आहार म्हटले जाते. आपण मात्र शरीराची नेमकी गरज काय, किती हे न समजून घेता अतिप्रमाणात खात असतो.
अतिखाण्यामुळे मग पोट फुगणे, रक्तातील साखर कमी जास्त होणे, डोकेदुखी, पचनतंत्र बिघडणे अशी लक्षणे पाहायला मिळतात; मात्र हे अतिखाणे इटिंग डिसऑर्डरमध्ये बदलते तेव्हा मात्र आरोग्यविषयक गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात.
अतिखाण्याचा सरळसोट परिणाम म्हणजे वजनवृद्धी, त्यामुळे शारीरिक आरोग्यावरच नाही तर मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो. तणाव वाढतो, उत्तेजित होण्याचे प्रमाण अधिक होते.
* रक्तातील साखरेची पातळी सातत्याने कमी- जास्त होते. परिणामतः मधुमेह होण्याचे कारण होते.
* उच्च उष्मांक असलेले, मेदयुक्त जंक फूड इत्यादी पदार्थ अतिप्रमाणात खाण्यात आल्याने पचन तंत्र बिघडते.
* शरीरातील महत्त्वाचे अवयव जसे यकृत, मूत्राशय, पोट आणि इतर काही अवयव जे अन्नपदार्थांतील पाचक रस शोषण्यात सहभागी होतात त्यांची कार्यप्रणाली बिघडून जाते.
* अतिखाण्यामुळे उच्च रक्तदाब, हृदयाचे विकार, अधिक कोलेस्ट्रॉल, तसेच सांधेदुखी आदी समस्या भेडसावू शकतात.
* कर्करोग होण्याचा धोकादेखील वाढू शकतो.
* अतिखाण्यामुळे मुरुम, केस गळणे इत्यादी समस्या भेडसावू शकतात.
काही उपायांनी अतिखाण्याची ही सवय किंवा व्यसन आपण नक्कीच सोडवू शकतो.
पाणी आणि इतर पेय पदार्थ जसे सूप, हर्बल चहा, फळे, भाज्यांचा रस आदींचे सेवन अधिक प्रमाणात करावे.
भावनांच्या आहारी जाऊन खात राहणे टाळावे. भावनांना हाताळायला वेगळ्या पद्धतींचा वापर करावा.
जेव्हा भूक लागेल, शरीर मागणी करेल तेव्हाच खावे. थोडीशी भूक ठेवून जेवावे.
नियमितपणे व्यायाम, योगसाधना आणि ध्यानधारणा करावी. त्यामुळे आपल्याल उत्तेजित होणे, एकटेपणा वाटणे, तसेच उदास वाटणे यापासून आराम मिळेल. जास्तीच्या कॅलरी जळण्यास मदत होईल.
आहाराचे पोषक पर्याय शोधावेत. फळे, सुकामेवा, भाज्या, फुटाणे, दही, सायविरहीत दूध, हर्बल चहा, ताजा लिंबूरस, सूप, भाज्यांचा रस यांचे सेवन अधिक प्रमाणात करावेत.
दररोज 25 ग्रॅम तंतुमय पदार्थांचे सेवन करावे. सलाड आणि मोड आलेली धान्ये हे तंतुमय पदार्थांचा चांगला स्रोत आहेत.
न्याहारी, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण यांच्या वेळा निश्चित असाव्यात.
सकाळी उठल्यावर फार वेळ उपाशी राहू नये आणि रात्री झोपण्यापूर्वी कमीत कमी दोन तास आधी भोजन करावे.
भाज्या, फळे जास्त प्रमाणात खावीत. त्यामुळे पोट भरल्यासारखे वाटते आणि आपल्या आहारातून कमी कॅलरीज जातात.
दोन वेळा भरपेट जेवण करण्याऐवजी दिवसातून चार वेळा थोडा-थोडा आहार घ्यावा. दर तीन ते चार तासांनी काहीतरी खावे.