मधुमेह : सायलेंट किलर | पुढारी

मधुमेह : सायलेंट किलर

डॉ. निकिता दोशी

टाईप-2 प्रकारातील मधुमेह बद्दल डॉक्टर ‘छुपा’ आणि ‘मूक’ (सायलेंट) हे दोन शब्द नेहमी उच्चारतात. इंटरनॅशनल डायबेटिक फेडरेशनच्या (आयडीएफ) आकडेवारीनुसार 2020 या वर्षात जगभरात 46.3 कोटी व्यक्तींचा मधुमेहामुळे मृत्यू झाला. त्यापैकी 8.8 कोटी व्यक्ती आग्नेय आशियातील आणि 7.7 कोटी व्यक्ती भारतातील होत्या.

मधुमेह हळूहळू वाढतो

टाईप-2 मधुमेह अचानक होत नाही. तो हळूहळू बळावत जातो. अचानक एका दिवशी रक्तशर्करेचे प्रमाण 250 किंवा 300 होत नाही.
जेव्हा टाईप-2 प्रकारचा मधुमेह विकसित व्हायला सुरुवात होते तेव्हा शरीर इन्सुलिनला प्रतिसाद देत नाही किंवा प्रतिबंध करते किंवा रक्तातील साखरेला नियंत्रित करण्यासाठी आवश्यक असलेले पुरेसे इन्सुलिन स्वादुपिंड तयार करू शकत नाही. त्यामुळे मधुमेह असलेल्या व्यक्तींच्या रक्तात खूप ग्लुकोज किंवा साखर असते, जिचा शरीरावर म्हणजे हृदय, रक्ताभिसरण, डोळे आणि मूत्रपिंडाच्या कार्यावर विपरीत परिणाम होतो.

टाईप-2 मधुमेहाची लक्षणे

टाईप-2 मधुमेह असलेल्या व्यक्तींमध्ये सुरुवातीला कोणतीच लक्षणे किंवा संकेत दिसत नाहीत. सुरुवातीची लक्षणे सौम्य असतात किंवा अजिबात नसतात. त्यानंतर जसजशी रक्तसाखर 250-300 मिग्रॅ/डीएल जाते. तेव्हा त्या व्यक्तीला थकल्यासारखे वाटते, वजन कमी होते, खूप तहान लागते, सारखी भूक लागते आणि खूप वेळा लघवीला जावे लागते.

संबंधित बातम्या

तुम्हाला कदाचित धोका असू शकतो?

टाईप-2 मधुमेहासाठी अनेक घटक कारणीभूत ठरतात. ते पुढीलप्रमाणे :
कौटुंबिक पार्श्वभूमी
वय 45 हून अधिक
गर्भधारणेच्या वेळी झालेला मधुमेह
बॉडी मास इंडेक्स 25 किंवा कंबरेचे माप 40 इंच पुरुषांसाठी आणि महिलांसाठी 35 इंच

बैठी जीवनशैली

अनेकांना प्रीडायबेटिस (मधुमेहपूर्व परिस्थिती) असू शकते, ज्यात रक्तातील साखरेची पातळी सामान्य पातळीहून अधिक असते; पण टाईप-2 मधुमेहाइतकी नसते. सामान्य फास्टिंग ब्लड शुगर (उपाशीपोटी रक्तातील साखरेचे प्रमाण) 70 ते 99 असावे.

उपाशी पोटी रक्तातील साखरेचे प्रमाण 125 हून अधिक असेल तर मधुमेह असल्याचे समजले जाते; पण 100 ते 125 मिग्रॅ/डीएल या परिस्थितीला प्रीडायबेटिस म्हणतात.

रक्तातील साखर जास्त आहे, हे लवकर समजले तर अनेकजण वजन कमी करून आणि व्यायाम वाढवून हा आजार टाळू शकतात किंवा त्यांची वाढ होणे थांबवू शकतात आणि काही वेळा त्यांच्या रक्तातील शर्करेची पातळी सामान्य करू शकतात.

धोका कमी करा

* मधुमेह बळावण्याची शक्यता कमी करण्यासाठी खालील पायर्‍यांचा विचार करावा :
* वजन प्रमाणात ठेवा
* चांगला आणि सकस आहार घ्या
* व्यायाम करा
* दरवर्षी टाईप-2 मधुमेहाची तपासणी करा

मधुमेहासह जगणे सुरुवातीला आव्हानात्मक असू शकते; पण योग्य माहिती असेल आणि आधार असेल तर त्यावर नियंत्रण ठेवणे नक्कीच शक्य आहे. आरोग्यदायी आहाराविषयी जागरूक असणे, प्रत्येक दिवसासाठी व्यायामाचे नियोजन करणे आणि रक्तातील शर्करेवर लक्ष ठेवणे, तसेच योग्य औषधे घेणे यामुळे तुमची रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास आणि या आजारामुळे होणारी गुंतागुंत टाळण्यास मदत होऊ शकते.

Back to top button