जीभ पांढरी असणे हे अनेक शारीरिक आजारांचे संकेत | पुढारी

जीभ पांढरी असणे हे अनेक शारीरिक आजारांचे संकेत

डॉ. भारत लुणावत

जीभ पांढरी असणे ही फार गंभीर गोष्ट आहे, असे आपल्याला वाटत नाही. वास्तविक, जीभ पांढरी असणे हे अनेक शारीरिक आजारांविषयी संकेत देणारे आहे. अनेकदा जीभ पूर्ण पांढरी होते, तर काही वेळा जीभेवर पांढरे डाग दिसतात.

अर्थात, जीभ पांढरी होणे हे एखाद्या घातक आजाराचेही लक्षण असेल, असेही नाही, तरीसुद्धा जीभ पांढरी असणे ही गोष्ट दुर्लक्षिण्याजोगी नक्कीच नाही. एखाद्या आजारामुळेही जीभ पांढरी असू शकते. त्यामुळे  पांढरी दिसत असेल, तर त्याची कारणे शोधून वेळेवर त्यावर उपचार करणेही आवश्यक आहे.

कारणे कोणती?

 जीभ पांढरी होण्यासाठी काही सामान्य कारणेही असतात. सुकलेला गळा, तोंडाने श्वास घेणे, शरीरातील पाणी कमी होणे, मऊ पदार्थ जास्त प्रमाणात खाणे, ताप, धूम्रपान, दारू पिणे ही कारणे असतात. त्याशिवाय काही आजारांमुळेही जीभ पांढरी होते.

ल्युकोप्लेकिया : या स्थितीत तोंडाच्या आत हिरड्यांवर पांढरे पॅचेस तयार होतात. ल्युकोप्लेकिया सर्वसाधारणपणे जास्त धूम्रपान करणार्‍या आणि तंबाखू खाणार्‍या व्यक्तींमध्ये होत असल्याचे पाहायला मिळते. काही दुर्मीळ रुग्णांमध्ये ल्युकोप्लेकिया हा मुखाच्या कर्करोगामुळे विकसित होताना दिसतो.

ओरल लिचेन प्लेनस : रोगप्रतिकारक शक्तीमध्ये अडथळे निर्माण झाल्याने तोंडाच्या आत आणि जीभेमध्ये पांढरे पॅचेस निर्माण होतात. अनेकदा हिरड्या आणि तोंडाच्या अंतत्वचेला फोड येतात.

ओरल थ्रश : ज्या रुग्णांना मधुमेह असतो त्यांना हा आजार होतो. त्याशिवाय ज्या व्यक्तींची प्रतिकार शक्ती कमजोर असते उदा. एचआयव्ही, एड्सचे रुग्ण त्यांना हा त्रास होतो. बी जीवनसत्त्व आणि लोह यांच्या कमतरतेमुळे ओरल थ्रश होऊ शकतो.

सिफिलिस : हा एक लैंगिक संबंधातून पसरणारा आजार आहे. त्यातही तोंड येणे किंवा तोंडात फोड येणे असा त्रास होतो. या आजारावर योग्य उपचार न केल्यास जिभेवर पांढरे डाग येतात. ज्याला सिफिलिटिक ल्युकोप्लेकिया म्हटले जाते.

उपचार : ल्युकोप्लेकियासाठी उपचारांची गरज नाही. तो आपोआप बरा होतो. अर्थात, या त्रासासाठी दंतवैद्याचा सल्ला घेऊ शकता. जेणेकरून परिस्थिती फार धोकादायक नाही, याची खात्री करता येते. या आजारापासून मुक्ती मिळवण्यासाठी धूम्रपान आणि तंबाखू खाणे बंद करावे लागते.

त्याचबरोबर ओरल लिचेन प्लेनसची तपासणी डॉक्टरकडून करून घेण्याची आवश्यकता नाही. खूप जास्त खराब झाल्यास डॉक्टर माऊथ स्प्रे किंवा गुळणा करण्याचा सल्ला देतात; पण ओरल थ्रश या दोन्ही आजारांपेक्षा वेगळाच आजार आहे. त्यासाठी बुरशीविरोधी औषधांचा वापर केला जातो. ही औषधे विविध स्वरूपात मिळतात. जसे जेल, लिक्विड, औषधे.

सिफिलिस झाल्यास तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली पेनिसिलिनचा वापर करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला जातो. पेनिसिलिन असे प्रतिजैविक आहे जे सिफिलिसच्या जीवाणूचा नाश करते. एखाद्या रुग्णाला खूप वर्षांपासून सिफिलिस असेल, तर त्यांना पेनिसिलिनचा डोसही जास्त प्रमाणात द्यावा लागतो.

डॉक्टरकडे कधी जावे?

जीभेला वेदना होत असतील, जळजळ होत असेल, चावणे, गिळणे आणि बोलणे या क्रिया करताना त्रास होत असेल, ताप, वजन कमी होणे आणि त्वचेवर पुरळ येणे या परिस्थितीत मात्र त्वरित डॉक्टरशी संपर्क केला पाहिजे.

Back to top button