अफगाणिस्तान मधील ५ मोठी शहरे तालिबान्यांच्या ताब्यात | पुढारी

अफगाणिस्तान मधील ५ मोठी शहरे तालिबान्यांच्या ताब्यात

काबुल : वृत्तसंस्था

अफगाणिस्तान मध्ये हळूहळू तालिबान आपले पाय घट्टपणे रोवत आहे. बुधवारी तालिबानी दहशतवाद्यांनी कुंदुज प्रांताच्या लष्करी मुख्यालयावर ताबा मिळविला. दरम्यान, अमेरिकी तज्ज्ञांचा एक अहवाल समोर आला असून, तालिबान 90 दिवसांत काबूलवर ताबा मिळवू शकतो असे यामध्ये म्हटले आहे.

अमेरिकी सरकारच्या अधिकार्‍यांनी वॉशिंग्ट पोस्टशी बोलताना सांगितले, की तालिबान अमेरिकेच्या अपेक्षापेक्षा अधिक वेगाने अफगाणिस्तान मधील शहरांवर ताबा मिळवत आहे. तालिबानने 5 दिवसांत पाच प्रांतांच्या राजधान्यांवर ताबा मिळविला आहे. या सर्व शहरांमधून अफगाणी सैन्याला हाकलून लावले आहे.

तालिबान 30 दिवसांच्या आत काबूल शहराचा सर्वांशी संपर्क तोडू शकतो आणि 90 दिवसांच्या आत ते या शहराचे नियंत्रण आपल्या हाती घेवू शकतात, अशी शक्यता अमेरिकी गुप्तचर संस्थांनी व्यक्त केली आहे.

अफगाणिस्तान च्या सेनेन आणखी ताकद लावून तालिबान्यांना रोखण्याच प्रयत्न करू शकतात.मात्र तालिबान सातत्याने आपले पाय पसरवत असून, अशा परिस्थितीत राष्ट्रपती अशरफ गनी यांनी विद्यमान लष्कर प्रमुखांना हटविले आहे.

अमेरिकेचे विशेष राजदूत जलमाय खलीलजाद हे तालिबानने शस्त्रसंधी करावी यासाठी प्रयत्न करत आहेत. कतार, ब्रिटन, चीन, पाकिस्तान, उझबेकिस्तान, संयुक्त राष्ट्र आणि यूरोपियन यूनियनही तालिबानशी परिस्थितीबद्दल चर्चा करण्याचा प्रयत्न करत आहोत.

अफगाणिस्तानचे प्रभारी अर्थमंत्री खालिद पायनदा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून, अफगाणिस्तान सोडले आहे. तालिबानने अफगाणिस्तानच्या मुख्य कस्टम पोस्टवर ताबा मिळविला असल्यामुळे अफगाण प्रशासनाचा महसूल कमी होत आहे.

भारताने 2 राजदुतांना परत बोलावले

भारताने आतापर्यंत अफगाणिस्तानच्या 2 दुतावासांमधील आपल्या राजदुतांना परत बोलावले आहे. दरम्यान, अफगाणिस्तानी सैन्याने मंगळवारी 439 दहशतवाद्यांना ठार केले आहे. 77 दहशतवादी या चकमकीत जखमी झाले आहेत. अफगाणी सैन्याने गेल्या 24 तासांत विविध ठिकाणी दहशतवाद्यांविरूद्ध मोठी मोहीम राबविली आहे.

Back to top button