नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : काही दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या हद्दीत भारताचे एक क्षेपणास्त्र अनावधानाने पडले होते. या घटनेवर खेद व्यक्त करून या प्रकरणाची चौकशी केली जाईल, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी आज (मंगळवार) राज्यसभेत सांगितले. तसेच भारताची शस्त्रप्रणाली सुरक्षित हातामध्ये आहे, असेही त्यांनी यावेळी सभागृहाला आश्वस्त केले.
राजनाथ सिंह पुढे म्हणाले की, ही घटना ९ मार्च २०२२ रोजी घडली होती. ही घटना अनावधानाने घडलेली होती. क्षेपणास्त्र युनिटची नियमित देखभाल आणि सूचना सुरू असताना सायंकाळी सातच्या सुमारास अपघाताने क्षेपणास्त्र सोडण्यात आले. नंतर हे क्षेपणास्त्र पाकिस्तानच्या हद्दीत पडल्याची माहिती मिळाली होती. ही घटना खेदजनक असली तरी दिलासादायक म्हणजे यामध्ये जीवितहानी झालेली नाही.
या घटनेची गंभीर दखल सरकारने घेतली आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. क्षेपणास्त्र नेमके कोणत्या कारणामुळे सुटले, हे चौकशीनंतर समोर येईल. या घटनेबाबत ऑपरेशन्स, मेंटेनन्स आणि इंस्ट्रक्शनसाठीच्या एसओपीचाही आढावा घेण्यात येत आहे. भारताच्या शस्त्र प्रणालीच्या सुरक्षिततेला आणि सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे. यासंदर्भात काही त्रुटी आढळून आल्यास तत्काळ दुरुस्त करण्यात येते, असेही राजनाथ सिंह यांनी यावेळी स्पष्ट केले.
आमची क्षेपणास्त्र प्रणाली अत्यंत सुरक्षित आणि विश्वासार्ह आहे. तसेच सुरक्षा प्रक्रिया आणि प्रोटोकॉल उच्च दर्जाचे आहेत आणि त्यांचे वेळोवेळी पुनरावलोकन केले जाते. आमचे सशस्त्र दल अतिशय सज्ज आणि शिस्तप्रिय आहे. तसेच अशा प्रकारची यंत्रणा हाताळण्याचा चांगला अनुभव आहे.
दरम्यान, भारताचे ब्रह्मोस क्षेपणास्त्र पाकिस्तानच्या ह्द्दीपासून १२४ किलोमीटरच्या अंतरात जाऊन पडले होते. यावर पाकिस्तानने आक्षेप घेतल्यानंतर भारताने न डगमगता या घटनेबद्दल खेद व्यक्त केला होता. तर पाकिस्तानने म्हटले होते की, क्षेपणास्त्र ध्वनीच्या तिप्पट वेगाने उडत सुमारे ४० हजार फूट उंचीवरून त्यांच्या हवाई हद्दीत घुसले. हे क्षेपणास्त्र ६ मिनिटे हवेत होते. पाकिस्तानने या प्रकरणाच्या संयुक्त चौकशीची मागणी केली होती. परंतु ती भारताने फेटाळून लावली होती. तर अमेरिकेने भारताला जाहीरपणे पाठिंबा दिल्याने पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रातही हा मुद्दा उपस्थित केला होता.
हेही वाचलंत का ?
पहा व्हिडिओ : पहिली मालिका ते पहिला क्रश | Rapid Fire with aayush sanjeev