Maratha Reservation 
Latest

अण्णासाहेब पाटील जयंती : मराठा आरक्षणासाठी अण्णासाहेबांनी मृत्यूला मिठी मारली Maratha Reservation

दिनेश चोरगे

सातारा; पुढारी वृत्तसेवा : वर्षानुवर्षे अन्यायाच्या खाईत तडफडणाऱ्या कष्टकरी कामगारांना मायेचा हात देऊन कै. आमदार अण्णासाहेब पाटील यांनी कष्टकरी माथाडी कामगारांची ऐतिहासिक चळवळ उभी केली. नोकरीविषयक संरक्षण मिळण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून माथाडी अॅक्ट, १९६९ हा कायदा व त्यान्वये माथाडी मंडळाची स्थापना केली, कामाचे योग्य दाम व इतर सोयी-सवलती मिळवून देऊन कष्टकरी माथाडी कामगार व त्यांच्या कुटुंबीयांच्या जीवनाला स्थैर्य प्राप्त करुन देण्याचे महान कार्य कै. आमदार अण्णासाहेब पाटील यांनी केले. (Maratha Reservation)

अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वाढीसाठी कै. आमदार अण्णासाहेब पाटील यांनी केलेले कार्य अविस्मरणीय होते, अवघ्या दीड-दोन वर्षाच्या कालावधीत त्यांनी या संघटनेचा संपूर्ण महाराष्ट्रभर विस्तार घडवून आणला व संघटनेला लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन ठेवले. मराठा समाजाला आर्थिक निकषावर आरक्षण मिळावे, मराठा समाजाला न्याय मिळावा म्हणून दि. २२ मार्च १९८२ रोजी कै. आमदार अण्णासाहेब पाटील यांनी विधानभवनावर विशाल मोर्चा काढण्याचे नियोजन केले. मुंबईतील विशाल मोर्चासमोर बोलताना त्यांनी मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे व मराठा महासंघाच्या न्याय्य मागण्या मान्य झाल्या पाहिजेत, अन्यथा हा अण्णासाहेब पाटील आत्मदहन करेल, अशी घोषणा केली होती, त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे दि. २३ मार्च, १९८२ रोजी अण्णासाहेबांनी मोठ्या दिमाखाने मृत्यूला मिठी मारली. कै. आमदार अण्णासाहेब पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळण्याची केलेली मागणी शासनाने मंजूर केली नाही. त्यामुळे आपल्या प्राणाचे बलिदान त्यांनी दिले. त्यांच्या निधनामुळे माथाडी कामगार व मराठा समाज पोरका झाला. (Maratha Reservation)

कै. आमदार अण्णासाहेब पाटील यांचे व हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे मैत्रीचे संबंध होते. माथाडी कामगार चळवळ आणि मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी त्यांनी जो लढा उभा केला, त्यास त्यांनी मोलाची साथ दिली होती. अरे अण्णा, आयुष्यभर ओझं वाहिलं पण भार कधी वाटला नाही, पण तुझ्या मृत्यूचं हे ओझं नाहीरे सहन होणार अशी मार्मिकच्या मुख्य पृष्ठावर व्यंगचित्राद्वारे अण्णासाहेबांना बाळासाहेब ठाकरे यांनी श्रध्दांजली वाहिली.

संबंधित बातम्या 

राज्यात सन १९९४ मध्ये युती सरकार आले, त्यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष श्री. किसनराव वरखिंडे यांनी कै. आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या नावाने महामंडळ व्हावे, अशी मागणी तत्कालीन राज्य शासनाकडे केली होती. या मागणीची दखल घेऊन तत्कालिन मुख्यमंत्री मा. मनोहर जोशी व उपमुख्यमंत्री स्व. गोपीनाथ मुंडे यांच्याकडे बाळासाहेब ठाकरे यांनी माथाडी कामगार आणि मराठा समाजासाठी अखेरपर्यंत लढा देणारे कै. आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या नावाने महामंडळ स्थापन करण्याची शिफारस केली. त्यानुसार तत्कालीन सरकारने रोजगार व स्वयंरोजगार विभाग शासन निर्णय क्रमांक अमामं १९९८ / प्र.क्र. ३६३/रोस्वरो-१, दि. २७ नोव्हेंबर, १९९८ द्वारे अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची स्थापना केली. राज्यात आर्थिकष्ट्या मागास असलेल्या घटकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या समाजाचा सामाजिक विकास करणे, विशेष करुन या समाजातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांकरिता रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याकरिता आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या विकासासाठी महामंडळ स्थापण्याचा गौरवास्पद निर्णय युती सरकारने घेतला. (Maratha Reservation)

तत्कालिन मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सन २०१८ मध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ पुनर्जीवित केले. मराठा समाजातील युवकांना उद्योजक करण्यासाठी या मंडळामार्फत विविध योजना जाहीर केल्या. महामंडळाकरिता शासनाने जाहीर केलेल्या विविध योजनांची अंमलबजावणी होण्याकरिता के, आमदार अण्णासाहेब पाटील यांचे सुपुत्र मा. नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांची महामंडळाच्या अध्यक्षपदी नेमणूक केली, या पदाला कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा दिला. मा. नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी अध्यक्ष पदी नेमणूक झाल्यानंतर महाराष्ट्रातील विविध जिल्हे व तालुक्यांमध्ये दौरे करून अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांचा मराठा समाजातील युवकांना लाभ मिळवून देऊन अंदाजे ५० हजारपेक्षा जास्त युवकांना उद्योजक केले.

मध्यंतरी राज्य सरकारमध्ये बदल झाल्यामुळे अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे संचालक मंडळ रद्द केले, मात्र राज्यात हिंदुत्ववादी सरकारची स्थापना झाल्यानंतर दि. २५ सप्टेंबर २०२२ रोजी स्व. आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या ८९ व्या जयंतीनिमित्त आयोजित नवी मुंबईतील मेळाव्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदेसाहेब व उपमुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या अध्यक्ष पदी अत्यंत कुशलतेने काम केलेले मा. नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांची फेरनिवड करण्याची घोषणा करून शासनाच्या कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या शासन निर्णय क्रमांक अपाम-२०१७/प्र.क्र.१०/रोस्वरो-१, दि. ०४ सप्टेंबर २०२२ द्वारे अध्यक्षपदी निवड केली व या पदाला मंत्री दर्जा दिला.

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांची निवड झाल्यानंतर लगेचच त्यांनी जिल्हा व तालुक्यांचे दौरे करून एक लाख युवकांना उद्योजक करण्याचा मानस त्यांनी केला आहे.  (Maratha Reservation)

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT