शहागड, पुढारी वृत्तसेवा : अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे १७ दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी बसलेल्या आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना मुख्यमंत्री यांनी आज (दि.१४) भेट देऊन आरक्षणाबाबत अर्धा तास चर्चा केली. यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांच्याहस्ते सकाळी ११ वाजून १ मिनिटांनी ज्यूस पिऊन उपोषण सोडण्यात आले. "मराठा समाजाला आरक्षण मिळणारच" अशी ग्वाही शिंदे यांनी दिली. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री गिरीश महाजन, उदय सामंत, संदीपान भुमरे, आ. राजेश टोपे, माजी मंत्री अर्जुन खोतकर, आ. नारायण कुचे यांची उपस्थिती होती.
अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे दि. २९ ऑगस्टपासून मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले होते. सरकारने मागितलेल्या एक महिन्याच्या मुदतीनंतर आंदोलक मनोज जरांगे यांनी ग्रामस्थांशी चर्चा केली. आणि सरकारला सरसकट मराठा आरक्षण देण्यासह ५ अटी देऊन उपोषण सोडविण्यात येईल, असे म्हटले होते. यानंतर आज मुख्यमंत्र्यांसह, मंत्री उपोषण सोडविण्यासाठी दाखल झाले.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "मनोज जरांगे हा समाजासाठी लढतोय. त्याने वैयक्तिक फायद्यासाठी माहीही मागितले नाही. मराठा समाजासाठी मराठा आरक्षण ही सरळ भूमिका मांडली. मी मनोजला मनापासून शुभेच्छा देतो आणि अभिनंदन करतो. तो समाजासाठी आरक्षण मिळविण्यासाठी प्रामाणिक राहिला. पहिल्या दिवसापासून मराठा आरक्षणासाठी लोकांनी सहकार्य केले. मराठा समाजासाठी १७ टक्के आरक्षण दिले होते. हायकोर्टाने १३ टक्के आरक्षण दिले. मात्र सुप्रीम कोर्टाने ते फेटाळले. का फेटाळले हे आता बोलणे योग्य नाही. ते जरांगे यांना माहित आहे. ३७०० तरुणांना नोकऱ्या दिल्या. सारथीमध्ये पैसे भरले. आपलं गेलेले आणि रद्द झालेले आरक्षण आपल्याला मिळवायचं आहे, आम्ही ते मिळवणारच. निजाम काळात नोंदी असतील नसतील हे सर्व समिती बघेल, असेही शिंदे म्हणाले.
मराठा समाज मागास कसा आहे. हे आता आपल्याला सिद्ध करायचे आहे. याठिकाणी झालेला लाठीचार्ज खेद्जनक बाब आहे. त्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागितली आहे. या घटनेत दोषी आढळून आलेल्या तिघांना बडतर्फ करून एकाला सक्तीच्या रजेवर पाठविले आहे. आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची हालचाल सुरु आहे. आरक्षण टिकले पाहिजे, असेच आरक्षण देऊ. दिलेले आरक्षण सुप्रीम कोर्टातही टिकले पाहिजे. कुठल्याही जातीशी आमचा मतभेद नाही. सुप्रीम कोर्टाने काढलेल्या त्रुटी पूर्ण करण्याचे काम समिती करत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
आरक्षण देण्यास सरकार कटीबद्ध आहे. आरक्षणाबाबत तुमच्याकडे असलेली माहितीची देवाण-घेवाण करा. कारण या तज्ञ लोकांच्या समितीला ही माहिती दिल्यास आरक्षण मिळण्यास मदत होईल. मी सर्व प्रोटोकॉल बाजूला ठेऊन मनोजला भेटायला आलो. जेव्हा जेव्हा मनोजला बोललो तेव्हा तब्येतीची चौकशी केली. उपोषण सोडल्यानंतर मनोजने हॉस्पिटलमध्ये जाऊन दोन-तीन दिवस उपचार घ्यावेत. मी देखील गरीब कुटुंबातील कार्यकर्ता आहे. म्हणून काळजी करू नका हायकोर्टाने देखील आंदोलनाची दखल घेतली आहे. मनोज जरांगे यांच्या तब्येतीची काळजी आता सरकार घेईल, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः आरक्षणाबाबत लक्ष घालणार आहेत. महाराष्ट्राच्या मराठा समाजाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून धाडशी निर्णय घेण्याची क्षमता असल्याची जाणीव आहे. म्हणूच मी मराठा समाजाला प्रामाणिक राहून उपोषणाबाबत एक महिन्याची मुदत दिली आहे. मुख्यमंत्री यांनी दिलेला शब्द पाळावा. मराठा समाजाला न्याय द्यावा. मी कुणाच्या सांगण्यावरून आंदोलन करत नाही. तुमच्या राजकारणासाठी आमचा बळी घेऊ नका, घात करू नका. माझं वाटोळे झाले तरी चालले. पण दिलेला शब्द तुम्ही पाळा. आरक्षण घेतल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. जीव गेला तरी चालेल पण आरक्षण घेणारच. माझ्या समाजाला माझी विनंती आहे. तुम्ही आमच्याकडून आणखी १० दिवसांचा वेळ घ्या, पण आम्हाला आरक्षण द्या. आपल्याला आरक्षण मिळणारच. मी शिंदे साहेबांच्या मागे लागणार त्यांना स्वस्थ बसू देणार नाही, असे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
हेही वाचा :