Maratha Reservation Protest : मराठा आरक्षणासाठी जरांगे-पाटील यांची मुलगीही उतरली मैदानात; भाषण सोशल मीडियावर व्हायरल | पुढारी

Maratha Reservation Protest : मराठा आरक्षणासाठी जरांगे-पाटील यांची मुलगीही उतरली मैदानात; भाषण सोशल मीडियावर व्हायरल

बुलढाणा, पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी आता जरांगे-पाटील यांची मुलगीही मैदानात उतरली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंतरवाली सराटी गावात येथील आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. यानंतर पोलिसांच्या या कृतीच्या विरोधात राज्यभरात आंदोलने सुरु झाली आहेत. आज (दि.१३) सकल मराठा समाजाच्या वतीने भव्य मराठा मोर्चा काढण्यात आला.  या मोर्चात मनोज जरांगे पाटील यांची लेक पल्लवी व जरांगे यांच्या दोन भगिणी भारती कराटे व शोनल शिंदे प्रामुख्याने उपस्थित होत्या.

 पल्लवी जरांगे (वय १४) हिने कणखरपणे भाषणाला सुरुवात करताच अवघे वातावरण भारावून गेले. पल्लवी जरांगे पाटील या वेळी बोलताना म्हणाली, मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे. आपला आरक्षणाचा हक्क मागण्यासाठी. ओबीसींना आरक्षण देताय आम्हाला का नाही? असा सवालही तिने केला. पल्लवी जरांगे हिच्या भाषणााल हजारो हातांच्या टाळ्यांनी जोरदार प्रतिसाद दिला.

आम्ही मराठा कुणबी आहोत याचा आम्हाला अभिमान आहे. माझा बाप १६ दिवसांपासून उपाशी आहे. त्यांचे उपोषण आंदोलन शांततेत सुरु असतांना पोलिसांनी लाठीचार्ज केला. तुम्हाला आंदोलन मोडायचे आहे का? आम्ही वाघाची जात आहोत,आमच्या नादी लागू नका अशा शब्दात पल्लवीने सुनावले. आम्ही हक्कासाठी लढतोय, आमचा हक्क मागतोय आम्ही कुणाच्याही विरोधात नाही, असे सांगून पल्लवी जरांगे हिने आपल्या पित्याची आंदोलनाची भूमिका पोटतिडकीने मांडली.

आठवीत शिकणा-या पल्लवीने, आरक्षणाअभावी मराठा समाजातील युवकांच्या शिक्षणाच्या व नोकरीच्या संधी गमावल्या गेल्याने समाजाची आर्थिक दुरावस्था होत असल्याचे सांगितले. स्थानिक जिजामाता प्रेक्षागार येथून मराठा क्रांती मोर्चाला सुरूवात झाली. भगवे झेंडे, मराठा आरक्षणाच्या मागण्यांचे फलक,जोरदार घोषणांनी शहर दणाणून गेले होते. मोर्चाचे वतीने जिल्हाधिका-यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. अन्य पाच युवतींचीही यावेळी समयोचित भाषणे झाली.

हेही वाचलंत का?

Back to top button