Maratha Reservation : मराठा आरक्षणप्रश्नी 14 ऑक्टोबरला विराट मेळावा घेणार : मनोज जरांगे-पाटील | पुढारी

Maratha Reservation : मराठा आरक्षणप्रश्नी 14 ऑक्टोबरला विराट मेळावा घेणार : मनोज जरांगे-पाटील

वडीगोद्री; पुढारी वृत्तसेवा :  मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारला दिलेली एक महिन्याची मुदत 14 ऑक्टोबरला पूर्ण होत आहे. या दिवशी समाज बांधवांचा विराट मेळावा घेण्याची घोषणा मनोज जरांगे-पाटील यांनी शनिवारी केली.

अंतरवाली सराटी येथे आंदोलनस्थळी समाज बांधवांच्या बैठकीत जरांगे यांनी हा निर्णय घेतला. अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे 14 ऑक्टोबरच्या मेळाव्याच्या नियोजनासाठी शनिवारी दुपारी उपोषणस्थळी बैठक झाली. मेळाव्यासाठी छत्रपती संभाजीनगर, बीड आणि जालना जिल्ह्यातील गोदापट्ट्यातील 123 गावांसह महाराष्ट्रातील मराठा समाज बांधव लाखोंच्या संख्येने सहभागी होणार आहेत. त्यासाठी मनोज जरांगे-पाटील राज्यव्यापी दौरा करणार आहेत.

जरांगे-पाटील यावेळी म्हणाले की, मराठा आरक्षण देण्यासाठी सरकारने एक महिन्याची वेळ मागितली होती. आपण त्यांना दहा दिवस जास्तीचा वेळ दिला. एक महिन्याची मुदत 14 ऑक्टोबरला संपत आहे. तोपर्यंत सरकारने मराठा आरक्षणाचा जीआर काढावा. अन्यथा सरकारवर दबाव टाकण्यासाठी आणि मराठा समाजाची एकी दाखविण्यासाठी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. मेळाव्याला राज्यभरातून मराठा बांधव मोठ्या संख्येने येतील, असा विश्वास मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

भर पावसातही उपोषण

उपोषणाच्या आठव्या दिवशी शुक्रवारी पावसाने हजेरी लावल्याने उपोषणस्थळावरील मंडप कोसळला होता. तरीही आंदोलकांनी आंदोलन स्थळ सोडले नाही.

Back to top button