खेड ; पुढारी वृत्तसेवा : कृष्णानगर पाटबंधारे वसाहतीमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी हस्तांतरीत केलेल्या जागेवरच्या अतिक्रमण केलेल्या व्यापारी गाळ्यांवर हातोडा टाकण्यात आला. या कारवाईत सुमारे २५ ते ३० व्यापारी गाळ्यांवर हातोडा टाकण्यात आला. दुकान गाळ्यांवर पोलीस प्रशासन व कार्यकारी अभियंता धोम कालवे विभाग क्रं २ यांनी संयुक्तरित्या कारवाई करून अतिक्रमण केलेल्या दुकान गाळ्यांच्या इमारती जमीनदोस्त केल्या.
कृष्णानगर वसाहतीमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्या नावे सुमारे ६२.६ एकर क्षेत्र हस्तांतरीत झाले आहे.
या जागेचा सात बारा उतारा वैद्यकीय महाविद्यालयाच्या नावावर झाला असून, लवकर या ठिकाणी महाविद्यालयाच्या इमारतीचे आराखड्यानुसार बांधकाम सुरू करण्यात येणार आहे. वसाहतीमधील येथील जागेत सुमारे ४० ते ४५ वर्षापूर्वीचे दुकान गाळे आहेत. येथील दुकान गाळे खाली करण्यासाठी धोम कालवे विभाग क्र २ ने संबंधित व्यापाऱ्यांना नोटीस दिल्या होत्या. परंतु व्यापाऱ्यांनी पर्यायी जागेची मागणी करून दुकान गाळे खाली करण्यास नकार दिला होता.
या बाबत संबंधित लोकप्रतिनिधींना ही व्यापाऱ्यांनी साकडे घातले होते. वैद्यकीय महाविद्यालयाला येथील दुकान गाळ्यांसह अन्य इमारतींची जागा मोकळी करून देण्यासाठी अखेर धोम कालवे विभाग क्र. २ व पोलीस प्रशासनाने व्यापाऱ्यांच्या दुकान गाळ्यांवर कारवाई करून बांधकामे जमीनदोस्त केली. या वेळी पाटबंधारे विभागाचे अधिकारी व व्यापाऱ्यांमध्ये वादावादी झाली.
सुमारे २५० पोलीसांचा फौजफाटा याकामी तैनात करण्यात आला होता. घटनास्थळी तहसीलदार आशा होळकर, उपविभागीय पोलीस अधिकारी आंचल दलाल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवानराव निंबाळकर, धोम कालवे विभाग क्र. २ चे कार्यकारी अभियंता विकास पाटील उपस्थित होते.