करिअरमध्ये होणार्या बदलाचा परिणाम शिक्षण क्षेत्रावर होत असून, ते बदल आपल्याला दिसत आहेत. पालकही पाल्यांच्या करिअर बाबत किंवा शिक्षणाबाबत जागरूक असले; तरी डॉक्टर किंवा इंजिनिअरच व्हायचेय, हा पारंपरिक हट्ट आता सोडून देताना दिसून येत आहे.
शिक्षणात आणि करिअरमध्ये झालेल्या व्यापक बदलाने मुलांना अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. मग संगीत असो किंवा माहिती आणि तंत्रज्ञान असो, याबाबत प्रशिक्षण देणार्या आणि नोकरी देणार्या असंख्य संस्था, कंपन्या निर्माण होत असल्याने कुशल मनुष्यबळाची दिवसेंदिवस मागणी वाढत चालली आहे.
* करिअरसाठी 250 पर्याय : आज वाढती स्पर्धा आणि माहिती-तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे करिअरच्या नवनवीन वाटा निर्माण होत आहेत. देशातील पंधराहून अधिक मोठ्या उद्योगांत करिअरचे अडीचशे पर्याय आहेत. आर्टस्, कॉमर्स, सायन्स फॅकल्टीतील मुलांना या कंपन्यांत कोणता ना कोणता जॉब उपलब्ध आहे. आपली आवड, इच्छाशक्ती, संशोधन आणि मेहनतीच्या जोरावर योग्य करिअरची निवड करू शकतो.
* बारावीनंतर एमबीए करा : बारावीनंतर पाच वर्षांचा इंटिग्रेटेड एमबीए प्रोग्राम देणारी आयआयएम इंदूर ही पहिली संस्था होय. हा एक युनिक क्रिएटिव्ह प्रोग्राम आहे. यासाठी किमान बारावी किंवा तत्सम अभ्यासक्रम उत्तीर्ण गरजेचे आहे.
* गणित किंवा विज्ञानाशिवाय आयआयटी : आयआयटी मद्रास येथे पाच वर्षांचा इंटिग्रेटेड एमए अभ्यासक्रम दोन विषयांसाठी उपलब्ध आहे. डेव्हलपमेंट स्टडीज् आणि इंग्लिश स्टडीज् असे ते अभ्यासक्रम होत. यासाठी किमान बारावी उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे. सामाजिक विज्ञान आणि मानव विकासासाठी हे अभ्यासक्रम उत्तम मानले जातात.
* ऑडिओ व्हिज्युअल, फिल्ममेकिंग, प्रॉडक्शन, फोटोग्राफी : चित्रपटात अभिनेता आणि अभिनेत्रीला जेवढे महत्त्व असते, तेवढेच पडद्यामागे काम करणार्या असंख्य कुशल तंत्रज्ञांनादेखील असते. सिम्बॉयसिस इन्स्टिट्यूट ऑफ मीडिया अँड कम्युनिकेशन किंवा सिम्बॉयसिस इन्स्टिट्यूट ऑफ फोटोग्राफी या संस्थेत ऑडिओ व्हिज्युअल आणि बॅचलर ऑफ व्हिज्युअल आर्टस् आणि फोटोग्राफीचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय) आणि विस्लिंग वूडस् इंटरनॅशनल (डब्ल्यूडब्ल्यूआय) या संस्थांत फिल्ममेकिंग, म्युझिक प्रॉडक्शन, स्क्रीन रायटिंग, साऊंड एडिटिंग अँड डिझाईन, आर्ट डायरेक्शन, प्रॉडक्शन डिझाईन यासारखे असंख्य अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.
* कम्बाईन फॅशन अँड सायन्स : एनआयएफटी, व्हीआयटी यासारख्या महाविद्यालयांतून फॅशन टेक्नॉलॉजीसंदर्भात पदवी अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. फॅशन क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा, यासंबंधीचे शिक्षण घेऊन आपण करिअर करू शकतो. मोठमोठ्या टेक्स्टाईल कंपन्यांमध्ये अशा अभियंत्यांची मोठी मागणी आहे.
* इंजिनिअर न होता आय.टी.त काम करा : भारतात सध्या आय.टी. क्षेत्र हे सर्वाधिक रोजगार देणारे क्षेत्र ठरत आहे. यूएक्स डिझायनर, इंटराक्शन डिझायनर, कंटेंट रायटर, एचआर यासारख्या क्षेत्रांत काम करण्यासाठी अभियंता असण्याची गरज नाही. टीसीएस, इन्फोसिस, विप्रो या कंपन्यांत मनुष्यबळ खात्यात तज्ज्ञांची नेहमीच मागणी राहिलेली आहे. मुख्य प्रवाहात असलेल्या इंजिनिअरच्या समकक्ष सुविधा आय.टी.मध्ये अन्य क्षेत्रांत काम करणार्या कर्मचार्याला दिली जाते.कंपनीच्या निमित्ताने किंवा नोकरीच्या निमित्ताने परदेशात जाण्याची संधी आपल्याला हे क्षेत्र बहाल करते.