प्रभाग क्रमांक : 35 सनसिटी-माणिकबाग
सनसिटी-माणिकबाग प्रभागात (क्र. 35) सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी राजाराम पूल ते फन टाइम थिएटरदरम्यान दुहेरी उड्डाणपूल उभारण्यात आला. यामुळे वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत झाली आहे. मात्र, वडगाव पुलाखाली वीर बाजी पासलकर चौकात वाहतुकीचे नियोजन नसल्याने सिंहगड रस्त्यावर वाहतूक कोंडीची समस्या कायम आहे.
दत्तात्रय नलावडे
धायरीमार्गे पुण्याकडे जाताना दोन ठिकाणी उड्डाणपूल उतरविल्याने नागरिकांना नाहक वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. वडगाव बुद्रुक येथील कॅनॉल रस्त्यावर असणाऱ्या अनधिकृत भाजी मंडईमुळे देखील मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. क्रीडासंकुलाचे काम रखडले आहे. मुठा कालव्याची दुरवस्था झाली असून, परिसरात कचरा आणि राडारोडा साचल्याचे चित्र दिसून येत आहे. यामुळे परिसरातील रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मुठा नदीपात्रातील लाल फितीत अडकलेले रस्त्यांचे काम मार्गी लावणे आणि कॅनॉल रस्त्यावर वाहतूक वॉर्डनची नेमणूक करणे गरजेचे असल्याचे नागरिकांनी सांगितले.
या प्रभागात अद्याप एकही सुसज्ज क्रीडासंकुल नाही. नाट्यगृहाचे कामही अर्धवट आहे. सनसिटी येथे महापालिकेकडून उभारण्यात आलेली भाजी मंडई अजूनही सुरू करण्यात आली नाही. फन टाइम थिएटरजवळील नाट्यगृहाचे काम गेल्या 10 वर्षांपासून अर्धवट असल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. सनसिटी ते कर्वेनगर उड्डाणपुलाचे काम आणि इंडियन ह्यूम पाइप कंपनी ते सनसिटी येथील डीपी रस्त्याचे काम झाल्याने वाहनचालक आणि नागरिकांची सोय झाली आहे.
सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी राजाराम पूल ते वडगाव बुद्रुक फन टाइम थिएटरदरम्यान उड्डाणपूल उभारण्यात आला असून, या प्रकल्पासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. यामुळे वाहतूक कोंडीची समस्या काही अंशी सुटली आहे. मात्र, वाहतुकीची समस्या कायमची सोडविण्यासाठी नियोजन करण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. लोकवस्त्या, शाळा, दवाखान्यांत जाण्यासाठी रहिवाशांसह प्रवाशांना एक-दीड किलोमीटर अंतराचा वळसा घालावा लागत असल्याचे परिसरातील नागरिक आणि वाहनचालकांनी सांगितले.
या भागाचा 1997 मध्ये महापालिकेत समावेश करण्यात आला आहे. मात्र, परिसरात महापालिकेचा अद्ययावत दवाखाना नसल्याने नागरिकांना खासगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागत आहेत. त्यामुळे कमला नेहरू हॉस्पिटलच्या धर्तीवर या भागात महापालिकेचे रुग्णालय सुरू करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून अनेक दिवसांपासून होत आहे.
पर्वती येथील सर्वांत मोठ्या जनता वसाहत झोपडपट्टीला लागूनच हा परिसर आहे. मुठा कालवा, वडगाव बुद्रुकमार्गे जनता वसाहतीपर्यंत रस्ता झाल्यापासून या भागातील सरकारी जागांवर झोपडपट्ट्यांचे जाळे निर्माण झाले आहे. रस्त्यालगतच्या जागेवर रातोरात पत्र्याचे शेड उभारून झोपड्या उभारल्या जात आहेत. माजी लोकप्रतिनिधी आणि महापालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे.
ओढे आणि नाल्यांवर अतिक्रमण झाल्यामुळे त्यांच्या नैसर्गिक प्रवाहाला अडथळा निर्माण झाला आहे. तसेच परिसरात अनधिकृत बांधकामे झाली आहेत. त्यामुळे पावसाळ्यात अरुंद ओढे, नाल्यांचे पाणी नदीपात्रातील पाण्याच्या प्रवाहामुळे विरुद्ध दिशेने माघारी नागरी वस्त्यांत शिरत आहे. गेल्या वर्षी जुलैमधील परिसरात पुराने हाहाकार उडवला होता. शेकडो रहिवाशांचे स्थलांतर करण्यात आले होते. तसेच यंदा ओढे-नाल्यांसह ड्रेनेज लाइनचे पाणी विरुद्ध दिशेने नागरी वस्त्यांत शिरल्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली होती.
या प्रभागात पावसाळ्यात निर्माण होणारी पूरस्थिती ही सर्वांत गंभीर समस्या आहे. खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात जादा पाणी सोडल्यानंतर विठ्ठलनगर, एकतानगर, सिंहगड रस्ता परिसरातील लोकवस्त्या, सोसायट्यांत नदीपात्रातील पाणी शिरत आहे. पंचवीस वर्षांपूर्वी विठ्ठलनगर परिसरात पुराने निष्पाप रहिवाशांचे बळी गेले होते. नदीपात्राच्या परिसरात दाट नागरीकरण झाल्यापासून गेल्या पंचवीस ते तीस वर्षांपासून पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होत आहे.
उड्डाणपूल होऊनही वाहतूक कोंडी कायम
मुठा नदीपात्रातील रस्ते लाल फितीत अडकलेले
दरवर्षी पावसाळ्यात निर्माण होणारी पूरस्थिती
प्रभागात प्रशस्त क्रीडासंकुलाचा अभाव
इंडियन ह्यूम पाइप कंपनी ते सनसिटीकडे जाणारा डीपी रस्ता
कॅनॉल रस्त्यालगत करण्यात आलेले पदपथ
अंतर्गत रस्त्याचे झालेले सिमेंट काँक्रिटीकरण
मुबलक प्रमाणात पाणीपुरवठा होत आहे
सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपूल आणि खडकवासला मेट्रो प्रकल्पासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा केला. प्रभागातील प्रायेजा सिटी येथील नाल्यावर कल्व्हर्ट बांधण्यात आले आहेत. चोवीस तास पाणी योजनेचे काम बहुतांश मार्गी लावले आहे.प्रसन्न जगताप, माजी उपमहापौर
स्वर्गीय किशोर गोसावी बहुउदेशीय केंद्र उभारून त्यात महिलांना लघु व्यवसाय-निर्मितीचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरू करून नागरिकांना आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.ज्योती गोसावी, माजी नगरसेविका
छत्रपती राजाराम महाराज पुलावरील चौकात सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे यांचे स्मारक उभारले. सोसायट्यांच्या परिसरातील अंतर्गत रस्ते आणि कचरा व्यवस्थापनाचे काम केले आहेश्रीकांत जगताप, माजी नगरसेवक
हिंगणे, सनसिटी, माणिकबाग परिसरात नवीन उद्याने उभारण्यात आली आहेत. मुठा कालव्यावरून पर्वतीकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम मार्गी लावले आहे.मंजूषा नागपुरे, माजी नगरसेविका
पुण्याच्या मध्यवर्ती भागातील नागरिक प्रशस्त जागा, मोकळी हवा आणि वाहतूक कोंडीच्या त्रासापासून सुटका होण्यासाठी हिंगणे खुर्द येथे प्लॅट घेत आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांत या भागातही वाहतूक प्रचंड वाढली. वाहतूक कोंडीमुळे दांडेकर पुलावरून घरी पोहचण्यासासाठी अर्धा-पाऊण तास लागत आहे.विठ्ठल नलावडे, रहिवासी
माणिकबाग परिसरातील रस्ते आणि पदपथांवर अनधिकृत पथारी व्यावसायिक आणि भाजी विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे पदपथ आणि रस्त्यांवरून पादचाऱ्यांना चालणेही धोकादायक झाले आहे.विठ्ठल कोंडेकर, रहिवासी
आनंदनगर परिसरात अद्यापही मुलांना खेळण्यासाठी मैदान उपलब्ध नाही. महापालिका प्रशाननाने या भागात अत्यधुनिक क्रीडांगण उभारण्याची आवश्यकता आहे.विशाल बिरामणे, रहिवासी