

पुणे: टिंगरेनगर येथील विद्यानगर गल्ली क्रमांक ८ परिसरात बॉम्बमध्ये वापरल्या जाणार्या जिलेटिन कांड्या आणि डिनोनेटरचा मोठा साठा पोलिसांना मिळून आला.
त्यामध्ये १३८ जिलेटिन कांड्या आणि १३५ डिनोनेटरचा समावेश आहे. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. राहुल वाजे आणि किसन दंडवते (दोघेही रा. शिरूर) अशी दोघांची नावे आहेत.
याबाबत पोलिस हवालदार यशवंत किर्वे यांनी फिर्याद दिली आहे. दंडवते याच्याकडे ही स्फोटके बाळगण्याचा परवाना आहे. परंतु स्फोटके बाळगण्याच्या निर्धारीत नियमाचे पालन न करता हलगर्जीपणा केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल केल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मंगेश हांडे यांनी सांगितले.
विद्यानगर येथे काम करणार्या सफाई सेविकेला मोकळ्या प्लॉटलगतच्या पत्र्याच्या गेटजवळ एक पोते पदपथाच्या बाजूला ठेवलेले दिसले. संशय आल्याने तिने पोलिसांना माहिती दिली. विश्रांतवाडी पोलिसांनी तत्काळ धाव घेत तपासणी केली असात पोत्यामध्ये जिलेटिन कांड्या आणि डिटोनेटर वायर आढळून आले.
हे साहित्य सर्वसाधारणपणे खडक फोडण्यासाठी वापरले जाते. प्राथमिक चौकशीत हा साठा एका बांधकाम व्यावसायिकाचा असल्याचे समोर आले. वाजे आणि दंडवतेकडे परवाना आहे. मात्र, नागरिकांच्या जीवितास धोका होवू शकतो, अशा ठिकाणी साहित्य ठेवून निष्काळजीपणा केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.