

पुणेः मनी लॉन्ड्रिंगच्या धाकाने सायबर ठगांनी येरवडा येथील एका महिलेची 27 लाख 50 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे. मनी लॉन्ड्रिंगमध्ये तुमचे बँक खाते आणि मोबाईल क्रमांकाचा वापर झाला असून, तपासाला सहकार्य करा, नाहीतर तुमच्यावर कारवाई होईल, अशी भीती घालून ही फसवणूक करण्यात आली आहे. महिलेला धाक वाटावा म्हणून सायबर चोरट्यांनी त्यांची ओळख सीबीआय अधिकारी अशी करून दिली होती.
या प्रकरणी येरवडा परिसरात गोल्फ क्लब रस्त्यावरील व्हाइट हाऊस सोसायटीत राहणाऱ्या ५५ वर्षीय महिलेने फर्याद दिली आहे. त्यावरून येरवडा पोलिसांनी अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ५ ते २२ एप्रिल २०२५ या कालावधीत घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर चोरट्यांनी रितेश राव आणि शिवा सर अशी नावे सांगत महिलेला संपर्क साधला. सुरुवातीला त्यांनी आपण टेलिकॉम विभागाचे अधिकारी आणि नंतर सीबीआय अधिकारी असल्याचे तक्रारदार महिलेला सांगितले. तुमच्या मोबाईल नंबर आणि बँक खात्यांवरून मनी लॉन्ड्रिंगचे व्यवहार झाल्याची माहिती त्यांनी महिलेला दिली. या प्रकरणी तपासात मदत करावी लागेल, असेही त्यांनी बजावले.
तपासात मदत आणि केस क्लिअर करण्यासाठी तुमच्याकडील सर्व पैसे तात्पुरते आमच्याकडे जमा करावे लागतील, असे सांगून आरोपींनी फिर्यादी महिलेला वेगवेगळ्या बँक खात्यांमधून पैसे ट्रान्सफर करण्यास भाग पाडले.
त्यानुसार महिलेने २७ लाख ५० हजार रुपये पाठवून दिले. तपास पूर्ण झाल्यावर तुमचे पैसे परत केले जातील, असे त्यांनी सांगितले होते. पैसे परत न मिळाल्याने महिलेला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी पोलिसात धाव घेत तक्रार दिली. याप्रकरणी येरवडा पोलिस अधिक तपास करत आहेत.