

पुणे: 'तुम्ही माजी सैनिक काय कामाचे नाही, माझ्यावर यापूर्वी दोन केसेस आहेत. मी सीपींनासुद्धा भीत नाही,' अशी धमकी देऊन रस्त्यातील दगड उचलून दुसऱ्या सहकाऱ्याला मारण्यास जाणाऱ्या व भर रस्त्यात अश्लील शिवीगाळ करणार्या पोलिस अंमलदाराला पोलिस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर यांनी निलंबित केले.
केशव महादू इरतकर असे या पोलिस अंमलदाराचे नाव आहे. त्यांची कोर्ट कंपनी येथे नेमणूक केली होती. हा प्रकार येरवडा मध्यवर्ती कारागृह परिसरात भर रस्त्यावर ११ नोव्हेंबर २०२५ रोजी घडला होता.
पोलिस अंमलदार केशव इरतकर यांची कोर्ट कंपनीत नेमणूक होती. येरवडा कारागृह परिसरात कर्तव्यावर असताना त्यांनी पोलिस अंमलदार संदीप नाळे यांना 'तुम्ही माजी सैनिक काय कामाचे नाही, तुला बघून घेईन, तुझा आज मर्डर करतो, तुला माहिती नाही मी कोण आहे. माझ्यावर यापूर्वी दोन केसेस आहेत. मी सीपींनासुद्धा भीत नाही' अशी धमकी दिली.
दरम्यान, पोलिस उपनिरीक्षक घायगुडे हे इरतकर यांना कोर्ट कंपनी कार्यालयाकडे घेऊन जात असताना त्यांनी रस्त्यावरील दगड उचलून नाळे यांना मारण्यासाठी त्यांच्या अंगावर धावून गेले. अश्लील भाषेत शिवीगाळ केली. हा प्रकार घडल्यानंतर या घटनेचा अहवाल कोर्ट कंपनीच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांनी पोलिस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर यांच्याकडे सादर केला होता.
सोबत कर्तव्यावर असलेल्या पोलिस अंमलदाराला दगडाने मारण्याचा प्रयत्न तसेच खून करण्याची धमकी देऊन पोलिस दलाची प्रतिमा मलिन करणारे अशोभनीय वर्तन केल्याने पोलिस उपायुक्त शिवणकर यांनी केशव इरतकर याला निलंबित केले आहे.