

रावणगाव: आलेगाव (ता. दौंड) परिसरातील कदम वस्ती, भापकर वस्ती परिसरात बिबट्याने मागील आठवडाभरापासून धुमाकूळ घातला आहे. दौंड वन विभागाने याकडे तातडीने लक्ष देऊन उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
मागील आठवडाभरापासून या परिसरात बिबट्याचा वावर असून आठवडाभरापूर्वी रात्रीच्या सुमारास अशोक कदम व महादेव कदम यांच्या शेतात ट्रॅक्टर चालकाला बिबट्या दिसला होता.
मंगळवारी (दि. २५) रात्री भापकर वस्ती परिसरातील हेमंत खोसे यांच्या केळीच्या शेतात हनुमंत सूर्यवंशी यांच्या पाळीव कुत्र्याचा फडशा बिबट्याने पाडल्याचे सकाळी निदर्शनास आले. रावणगाव-दौंड रस्त्यावरील दौंड शुगर कारखाना परिसरात मंगळवारी साडे दहाच्या सुमारास गणेश पाचपुते या तरुणाला बिबट्या दिसला.
मागील १५ दिवसांपूर्वी रावणगाव-मळद परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला होता. तोच बिबट्या या परिसरात वावरत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. दौंड वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी लक्ष देऊन बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरत आहे.
आलेगाव-बोरीबेल परिसरातील बिबट्याच्या वावराने ग्रामस्थांसह शेतमजूर, महिला वर्ग, शालेय विद्यार्थी यांच्यामध्ये भीतीचे वातावरण आहे. वन विभागाने या ठिकाणी तातडीने पिंजरा लावावा.
बाळकृष्ण पाचपुते, माजी अध्यक्ष, बोरीबेल सोसायटी