

पुणे: ऑनलाइन खरेदी केलेल्या फळे आणि भाज्या खराब निघाल्या म्हणून परत करणे एका व्यक्तीला चांगलेच महागात पडले आहे. त्याला पैसे तर परत मिळाले नाहीत, मात्र त्या बदल्यात 79 हजार रुपये त्याला गमाविण्याची वेळ आली आहे.
यावर चोरट्याने ऑनलाइन ग्राहकसेवा केंद्राच्या संकेतस्थळाशी साधर्म्य असलेले संकेतस्थळ तयार करून त्या ठिकाणी आपला मोबाईल क्रमांक दिला होता. त्याद्वारे ही फसवणूक केली आहे. या प्रकरणी नारायण पेठेत राहणाऱ्या ७५ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यावरून विश्रामबाग पोलिस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना १५ नोव्हेंबरला घडली.
फिर्यादी महिलेने एका ऑनलाईन ॲपवरून काही फळे व भाज्या मागवल्या होत्या. मात्र, डिलिव्हरी आल्यावर त्यांनी पाहिले असता, फळे व भाज्या खराब असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी तक्रार करण्यासाठी आणि पैसे परत मिळविण्यासाठी संबंधित ॲपच्या ग्राहक सेवा हेल्पलाइनला फोन लावण्याचा निर्णय घेतला.
त्यांनी ऑनलाइन त्याचा शोध घेतला. त्यावर त्यांना दोन मोबाइल क्रमांक मिळाले. त्यांनी संबंधित क्रमांकांवर संपर्क साधला असता, समोरील व्यक्तीने स्वतःचे नाव प्रीतम मिश्रा असे सांगून कंपनीकडून बोलत असल्याचे सांगत महिलेचा विश्वास संपादन केला.
पैसे रिफंड मिळविण्यासाठी गुगल पेद्वारे काही प्रक्रिया करावी लागेल, असे त्या व्यक्तीने फिर्यादी महिलेला सांगितले. त्याने सांगितल्याप्रमाणे महिलेने प्रक्रिया केली. मात्र, त्यानंतर महिलेच्या बँक खात्यातून ७९ हजार २०८ रुपये आरोपीने स्वतःच्या खात्यात पाठवून घेतले. ही बाब लक्षात येताच तक्रारदार महिलेने पोलिसांकडे धाव घेतली. विश्रामबाग पोलिस याचा तपास करत आहेत.