वाहनांच्या गर्दीने तुंबलेला पुण्यातील लक्ष्मी रस्ता 
पुणे

लक्ष्मी रस्ता उद्या राहणार वाहनांविना

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा : वाहनांची वर्दळ आणि नागरिकांच्या गर्दीने बाराही महिने फुलून जाणारा शहरातील प्रमुख लक्ष्मी रस्ता उद्या शनिवारी वाहनविरहित दिसणार आहे.

वाहतूकव्यवस्थेत दुर्लक्षित ठरलेल्या पादचार्‍यांचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी, तसेच पादचार्‍यांची सुरक्षितता आणि त्यांच्यासाठी आवश्यक सुविधांकडे लक्ष वेधण्यासाठी महापालिकेने दरवर्षी 11 डिसेंबर हा पादचारी दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून उद्या (शनिवारी) शहरात पादचारी दिन साजरा केला जाणार आहे. नगरकर तालीम ते उंबर्‍या गणपती चौकापर्यंत लक्ष्मी रस्त्यावर सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत लक्ष्मी रस्त्यावर 'ओपन स्ट्रीट मॉल' हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

या कालावधीत या परिसरात खासगी वाहनांना बंदी असणार आहे. त्यामुळे वाहनांची भीती न ठेवता ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. या परिसरात ग्राहकांसाठी विविध मनोरंजक कार्यक्रमही होणार आहेत.

या उपक्रमाचे उद्घाटन महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते करण्यात येणार असून, या कालावधीत खरेदीसाठी येणार्‍या नागरिकांनी पादचारी दिनाचे महत्त्व लक्षात घेत खासगी वाहनांऐवजी पीएमपीचा वापर करावा, वाहन आणल्यास ते लक्ष्मी रस्त्यापासून योग्य अंतरावर पार्क करावे, वाहतुकीला अडथळा ठरणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

'पीएमपी'च्या वाहतुकीत बदल…

पीएमपीच्या पुण्यदशम, तसेच मंडई येथून गोखलेनगरकडे जाणार्‍या बसच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. पुण्यदशम अटलच्या पुणे स्टेशनकडून येणार्‍या बस सिटी पोस्ट चौकापर्यंत नियमित येऊन पुढे नूमवि हायस्कूल चौकातून उजवीकडे वळतील. बाजीराव रस्त्याने शनिवारवाडा, महापालिका पुलावरून जंगली महाराज रस्त्याने डेक्कनला जातील, तर गोखलेनगरकडे जाणार्‍या बसही याच मार्गाने जातील. डेक्कनहून पुणे स्टेशनकडे जाणार्‍या बसच्या मार्गांमध्ये कोणताही बदल नाही.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT