PMC Election Pudhari
पुणे

PMC Election: सहकारनगरात विकासकामे अर्धवट; वाहतूक कोंडी, अतिक्रमण आणि रस्त्यांचा प्रश्‍न अधिकच गंभीर

आंबिल ओढ्याचे काम रखडले, पार्किंगची सोय नाही, रस्ते-पदपथांची दुरवस्था कायम; नागरिक नाराज, प्रशासनाकडून दुर्लक्ष

पुढारी वृत्तसेवा

बाजीराव गायकवाड

सहकारनगर-पद्मावती प्रभागात (क्र. 36) गेल्या काळात अनेक विकासकामे झाली असली, तरी अद्यापही सुविधांपेक्षा समस्याच अधिक असल्याचे चित्र दिसून येत आहे. आपल्या कार्यकाळात नागरिकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केल्याचे माजी नगरसेवक सांगत आहेत, तर दुसरीकडे नागरिक समस्यांचा पाढा वाचत आहेत. या प्रभागात आंबिल ओढ्याचे खोलीकरण आणि सीमाभिंतीचे काम रखडले आहे. तसेच वाहतूक कोंडी, रस्ते आणि पदपथांची दुरवस्था, पार्किंग, अतिक्रमणे आदी समस्या कायम आहेत.

महापालिकेच्या गेल्या निवडणुकीत या प्रभागाचा क्रमांक 35 होता. आता या प्रभागाचा क्रमांक 36 झाला असून, त्यात बहुतांशी जुनाच भाग कायम आहे. गेल्या काळात या प्रभागात महापालिकेच्या माध्यमातून अनेक विकासकामे करण्यात आली आहेत. यात राजीव गांधी ई-लर्निंग स्कूल, भीमसेन जोशी कलादालन, तळजाई येथील स. दु. शिंदे स्टेडियम, पोटे दवाखाना, कैलासवासी बाबूराव वाळवेकर उद्यान, कै. काकासाहेब गाडगीळ उद्यानाचे सुशोभीकरण, क्रीडा संकुल आणि स्वीमिंग पूल आदी विकासकामांचा समावेश आहे. तसेच गेल्या काळात रस्त्यांची कामे करण्यात आली आहेत. अभ्यासिकाही बांधण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी आंबिल ओढ्याचे खोलीकरण करून पुलाची उंची वाढविण्यात आली आहे.

प्रभागातील विविध रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. पानशेत पूरग््रास्तांच्या घरांच्या मालकी हक्काचा प्रश्न अद्यापही प्रलंबित आहे. पदपथांवरील पेव्हिंग ब्लॉक अनेक ठिकाणी उखडलेले आहेत. रस्ते आणि पदपथांवरील अतिक्रमणांमुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. आंबिल ओढ्याचा प्रवाह मोकळा होण्यासाठी अद्यापही पुरेशा उपाययोजना करण्यात आल्या नाहीत.
चंद्रशेखर कोरडे, सामाजिक कार्यकर्ते

प्रभागातील पानशेत पूरग््रास्तांच्या घरांच्या मालकी हक्काचा प्रश्न अद्यापही प्रलंबित आहे. रस्त्यांची आणि पदपथांची दुरवस्था झाल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. तसेच ठिकठिकाणी रस्ते आणि पदपथांवर अतिक्रमणे झाली आहेत. श्री गजानन महाराज मंदिरासमोर रस्ता ते सारंग सोसायटीमधून जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर नेहमीच वाहतूक कोंडी होत आहे. एफएसआय वाढविल्याने अनेक ठिकाणी उंच इमारती झाल्याने नागरीकरण वाढल आहे. मात्र पाणीपुरवठा, ड्रेनेज, रस्ते आदी मूलभूत सुविधा जुन्याच आहेत.

प्रभागात अनेक ठिकाणी पार्किंगची व्यवस्था नाही. तळजाई पठारावर महापालिकेचा दवाखाना होणे गरजेचे आहे. मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. ड्रेनेज लाइन तुंबून वारंवार दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यांवर वाहत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
आकाश सरवदे, रहिवासी

आंबिल ओढ्याचे खोलीकरण आणि सीमाभिंतीचे काम अद्यापही पूर्ण झाले नाही. प्रभागात सार्वजनिक स्वच्छतागृहांची वानवा आहे. अनधिकृत पार्किंग आणि फलकांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. काही ठिकाणी ड्रेनेज लाइनची दुरवस्था झाल्याने वारंवार दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यांवरून वाहत आहे.

पद्मावती येथे पोटे दवाखाना उभारून नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिली आहे. कै. बाबूराव वाळवेकर उद्यान, अक्षरबाग आदी प्रकल्पही राबविण्यात आले आहेत. काकासाहेब गाडगीळ उद्यानाचे सुशोभीकरण केले आहे. वि. स. खांडेकर शाळा (इंग््राजी माध्यम) सुरू केली. आंबिल ओढ्याचे खोलीकरण आणि पुलाची उंची वाढविण्यात आली आहे.
अश्विनी कदम, माजी नगरसेविका

गेल्या काही वर्षांपासून निवडणुका न झाल्याने महापालिकेत प्रशासकराज आहे. प्रभागातील समस्या मांडण्यासाठी लोकप्रतिनिधी नसल्याने प्रश्न नेमके कोणाकडून सोडवावेत, असा संभम नागरिकांमध्ये आहे. तसेच गेल्या काळात चार नगरसेवकांच्या प्रभाग पद्धतीमुळे आपल्या समस्या सोडवून घेण्यासाठी नागरिक माजी लोकप्रतिनिधींकडे जात होते. मात्र हे काम माझ्याकडे नाही, दुसऱ्या नगरसेवकाकडे आहे, तत्कालीन लोकप्रतिनिधी सांगत होते. यामुळे चार नगरसेवकांच्या प्रभागात समस्या सोडविण्यासाठी नेमके जायचे तरी कोणाकडे, असाही प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आहे. कोरोनानंतरच्या काळात महापालिकेत प्रशासकराज आल्याने प्रशासनाचे परिसरातील विविध समस्यांकडे दुर्लक्ष झाल्याने रहिवाशांकडून नाराजी व्यक्त होत आहे.

प्रभागात राजीव गांधी ई-लर्निंग स्कूल सुरू केले. भारतरत्न भीमसेन जोशी कलादालनाची सोय उपलब्ध करून दिली. वसंतराव बागुल उद्यान, स्वर्गीय विलासराव देशमुख तारांगण, तळजाई येथे सदू शिंदे स्टेडियम, यशवंतराव चव्हाण सेवन वंडर्स ड्रीम पार्क आदी प्रकल्पांसह विविध विकासकामे केली आहेत.
आबा बागुल, माजी नगरसेवक

प्रभागात या भागांचा समावेश

गजलक्ष्मी सोसायटी, पर्वती इंडस्ट्रियल इस्टेट, गजानन महाराज मंदिर, तावरे क ॉलनी, नाला गार्डन, पद्मावती मंदिर, बटरफ्लाय उद्यान, वि. स. खांडेकर विद्यालय, वाळवेकरनगर, संतनगर, सहकारनगर क्र. 1 आणि 2, तळजाई वसाहत, तुळशीबागवाले कॉलनी, अष्टविनायक सोसायटी, शिवदर्शन, मुक्तांगण शाळा, पद्मावती, चव्हाणनगर, शंकर महाराज वसाहत, पंचवटी सोसायटी, विणकर सोसायटी, धनकवडी पठार, मेघदूत सोसायटी, स्प्रिंगहिल्स सोसायटी, कोणार्क विहार, तीन हत्ती आदी.

प्रभागातील प्रमुख समस्या

  • आंबिल ओढ्याचे खोलीकरण आणि सीमाभिंतीचे काम अद्यापही अर्धवट

  • तळजाई ते सिंहगड रस्त्यादरम्यान भुयारी मार्गाचे काम आव्हानात्मक काम.

  • नागरिकांसाठी महापालिकेच्या अद्ययावत रुग्णालयाची गरज

  • चोवीस तास पाणीपुरवठा योजनेचे काम अर्धवट

  • तळजाई टेकडी परिसरात वणवे रोखण्यासाठी अग्निशमन केंद्राची गरज

  • पानशेत पूरग््रास्तांना घरांच्या मालकी हक्काचा प्रश्न प्रलंबित

  • श्री गजानन महाराज चौकात वाहतूक कोंडीची समस्या गंभीर

वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी दोन नवीन रस्त्यांचे काम केले आहे. आद्य क्रांतिगुरू वीर लहुजी वस्ताद साळवे अभ्यासिका आणि वाचनालयाची उभारणी केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुल अद्ययावत केले. प्रभागातील प्रमुख चौकांचे सुशोभीकरण केले. आंबिल ओढ्याची सीमाभिंत बांधली. टांगेवाला कॉलनीत एसआरए प्रकल्प मार्गी लावला.
महेश वाबळे, माजी नगरसेवक

प्रभागात झालेली विकासकामे

  • तळजाई पठारावर क्रीडा संकुल प तळजाई टेकडी ऑक्सिजन पार्क

  • पोटे दवाखान्याची उभारणी, कै. काकासाहेब गाडगीळ उद्यानाचे सुशोभीकरण

  • राजीव गांधी ई-लर्निंग स्कूल प भारतरत्न भीमसेन जोशी कलादालन

  • वसंतराव बागुल उद्यान, वाळवेकर उद्यान

  • यशवंतराव चव्हाण सेवन वंडर्स पार्क

  • मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांची कामे

  • काही ठिकाणी आंबिल ओढ्याचे खोलीकरण

प्रभागातील रस्त्यांवर ठिकठिकाणी अनधिकृत फलक लावल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. सार्वजनिक स्वच्छताग्ृाहांची वानवा आहे. आंबिल ओढ्याच्या खोलीकरणाचे आणि सीमाभिंत काम लवकरात लवकर पूर्ण होणे गरजेचे आहे.
श्रेया फाटक, रहिवासी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT