महापालिकेच्या 2017 मधील निवडणुकीत गोखलेनगर-वाकडेवाडी या प्रभागात (क्र. 7) भाजपचे चार नगरसेवक निवडून आले होते. आगामी निवडणुकीत या प्रभागात भाजप आपले वर्चस्व कायम ठेवणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजप आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशी चौरंगी लढत या प्रभागात रंगण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सर्वच पक्षांकडे इच्छुकांची संख्या मोठी असल्याने तिकीट वाटप करताना पक्षश्रेष्ठींना कसरत करावी लागणार आहे.
या प्रभागाची लोकसंख्या 89 हजार 957 इतकी आहे. पूर्वी या प्रभागात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा प्रभाव होता. परंतु 2017 मधील महापालिकेच्या निवडणुकीत चित्र पालटले आणि भाजपने या प्रभागात वर्चस्व प्रस्थापित केले. त्या वेळी भाजपचे उमेदवार आदित्य माळवे, रेश्मा भोसले (भाजप पुरस्कृत), राजश्री काळे आणि सोनाली लांडगे हे विजयी झाले होते. तीन महिला नगरसेविक असलेला हा शहरातील एकमेव प्रभाग होता.
आगामी महापालिका निवडणुकीसाठी या प्रभागात ‘अ’ गट अनुुसूचित जाती प्रवर्ग (महिला), ‘ब’ गट नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), ‘क’ आणि ‘ड’ गट सर्वसाधारण प्रवर्ग, असे आरक्षण पडले आहे. या निवडणुकीत दोन जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी असल्याने बहुतांश इच्छुकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये लढत झाल्यास महाविकास आघाडी जोरदार टक्कर देईल. मात्र, घटक पक्ष स्वतंत्र लढल्यास भाजप बाजी मारण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीने एकत्रित निवडणूक लढवावी, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे. तसे झाल्यास भाजपच्या उमेदवारांपुढे महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे कडवे आव्हान असणार आहे.
महाविकास आघाडीकडून नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाईल, तसेच भाजपकडून माजी नगरसेवकांसह इतर इच्छुकांना संधी मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
आगामी पालिका निवडणुकीसाठी भाजपकडून माजी नगरसेवक माळवे, भोसले, काळे हे पुन्हा इच्छुक आहेत. मात्र, ओबीसी महिला आरक्षण आल्याने माळवे यांच्या ऐवजी त्यांच्या पत्नी सायली माळवे यांना संधी मिळू शकते, अनुसूचित जाती प्रवर्गातून रिपाइंच्या कोट्यातून निवडून आलेल्या लांडगे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. या जागेसाठी आता रिपाइंकडून सायली पवार, वर्षा खडसे आदी इच्छुक आहेत. याशिवाय भाजपकडून सर्वसाधारण जागेसाठी काँग््रेास अथवा राष्ट्रवादीतील एका इच्छुकाला आयत्यावेळी पक्षात घेऊन उमेदवारी दिली जाईल, अशी चर्चा आहे.
या प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेसचे देखील प्राबल्य आहे. मात्र पक्ष आता शरद पवार आणि अजित पवार या दोन गटांत विभागला गेल्यामुळे कोणता गट बाजी मारणार हे पाहणे देखील औत्सुक्याचे ठरणार आहे. पवार गटातून माजी नगरसेवक नीलेश निकम, शारदा ओरसे हे निवडणुकीच्या तयारीत आहेत.
काँग्रेसकडून दोन वेळेस विधानसभा निवडणूक लढविलेले माजी नगरसेवक दत्ता बहिरट निवडणूक लढविणार की नाही अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, त्यांच्या रूपाने या भागात काँग्रेसची ताकद कायम आहे. त्यांच्या भूमिकेवरच येथील राजकीय समीकरणे ठरणार आहेत. तर शिवसेनेतून माजी नगरसेविका लांडगे पुन्हा निवडणुकीच्या तयारीत आहेत.
या प्रभागात आघाडी झाल्यास भाजप समोर आव्हान उभे राहू शकते. सर्वच पक्षांची ताकद असल्याने येथील निवडणूक चौरंगी होण्याची शक्यता आहे. एकूणच चित्र पाहिले तर आगामी निवडणुकीत कोणाचे पारडे जड आणि कोणाचे कमी हे पाहणे मोठ्या औत्सुक्याचे ठरणार असून, ही निवडणूक रंगतदार होणार आहे.
भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये इच्छुकांची संख्या मोठी आहे. यामुळे उमेदवारी न मिळाल्यास नाराजी नाट्य उद्भवल्याने इच्छुक बंडखोरी करून इतर पक्षांकडून निवडणूक लढण्याची शक्यता आहे. यामुळे पक्षनेतृत्वासमोर बंडखोरी रोखण्याचे मोठे आव्हानही असणार आहे.
या प्रभागात गोखलेनगर, जनवाडी, पाटील इस्टेट, मुळा रस्ता या झोपडपट्टी भागातील मतदारांची संख्या मोठी आहे. मागील निवडणुकांमध्ये या भागांतून भाजपला चांगले मतदान झाले होते. मात्र, मूलभूत सुविधांसह नागरिकांच्या विविध समस्या सोडविण्यात माजी नगरसेवकांना म्हणावे तेवढे यश आलेले दिसत नाही. यामुळे या भागातील मते निर्णायक ठरणार असून, ते कुणाच्या पारड्यात पडणार यावर देखील उमेदवारांचे भवितव्य अवलंबून असणार आहे.
भाजप : रेश्मा भोसले, आदित्य माळवे, सतीश बहिरट, समाधान शिंदे, विकास डाबी, योगेश बाचल, हरीश निकम, निशा मानवतकर, अपर्णा गोसावी, प्रमिला आल्हाट, ज्योती भिसे, किरण ओरसे, प्रकाश सोलंकी.
काँग्रेस : दत्ता बहिरट, अजिज सय्यद, अनिल पवार, राजश्री अडसूळ.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) : नीलेश निकम, शारदा ओरसे, आशा साने, ॲड. स्वप्निल जोशी, केतन ओरसे.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) :
बाळासाहेब चव्हाण, अंजली ओरसे, सुरेखा साळुंखे, उषा नेटके, पूजा जाधव, अंकिता मोहिते.
शिवसेना (शिंदे गट) : सोनाली लांडगे, धनंजय जाधव, संजय तुरेकर, मोहिनी जाधव.
शिवसेना (ठाकरे गट) : राजू पवार, उमेश वाघ, सोनाली डोंगरे, करुणा घाडगे.
मनसे : सुहास निम्हण,
विनायक कोतकर, संजय तोडमल, गोकुळ अडागळे, मिलन भोरडे, शंकर पवार.