Maharashtra Temperatures Drop Pudhari
पुणे

Winter Temperature Drop Pune: राज्याला हुडहुडी! पुण्यात पाषाणमध्ये पारा ८.४ अंशांवर

यंदाच्या हंगामातील नीचांकी तापमान नोंद; शिवाजीनगरचा पारा ८.९ अंशांवर, पुढील काही दिवस थंडीचा प्रभाव कायम

पुढारी वृत्तसेवा

पुणे : मंगळवारपासून राज्यात सर्वत्र थंडीचा कडाका सुरू झाला असून, आगामी आठवडा तीव्र थंडीचा राहणार आहे. दिवसादेखील वातावरणात गारठा जाणवणार असल्याचा इशारा हवामानतज्ज्ञांनी दिला आहे, असे वातावरण १९ डिसेंबरपर्यंत राहील. मंगळवारी अहिल्यानगर ७.४, तर पुणे ८.४ अंश इतका पारा खाली आला होता.

यंदा बंगालच्या उपसागरात सेनयार आणि दितवाह अशी दोन चक्रीवादळे अल्यामुळे नोव्हेंबरमध्ये थंडीचा कडाका जाणवला नाही. मात्र, डिसेंबर उजाडताच थंडी सुटली. मात्र, ती सायंकाळी ७ ते पहाटे ६ पर्यंत जाणवत होती. दिवसभर कडक उन्हाची तीव्रता जाणवत होती. मात्र, मंगळवारपासून दिवसादेखील थंडी जाणवण्यास सुरुवात झाली. राज्यातील बहुतांश भागांचे किमान तापमान ३ ते ४ अंशांनी खाली येण्यास सुरुवात झाली आहे.

हुडहुडी भरवणारी थंडी

राज्यात प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्रात, मराठवाडा अन्‌ विदर्भाच्या काही भागांत रात्री थंडीच्या लाटेसह तर दिवसा थंड वाऱ्यामुळे हुडहुडी भरेल, असे वातावरण राहण्याची शक्यता आहे. मुंबईसह कोकणात मात्र पहाटेचे किमान तापमान सरासरी इतके जाणवू शकते.

ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितलेली कारणे...

- उत्तर भारतातून येणारे अति शीतल ईशान्यई वारे महाराष्ट्रात येत आहे.

- राज्यात हवेचा दाब वाढून १०१६ हेक्टा पास्कल इतका होत आहे. त्यामुळे थंडी टिकून राहण्याची शक्यता.

- दक्षिण भारतातील ईशान्य (हिवाळी) मान्सूनचा प्रभाव काहीसा कमी होऊन उत्तर भारतातून महाराष्ट्रात येणाऱ्या थंडीला अटकाव होण्याची शक्यता नाही.

- वायव्य आशियातून, सध्या उत्तर भारतात नियमितपणे एकापाठोपाठ मार्गक्रमण करणारे पश्चिमी (झंझावात) प्रकोप, त्यामुळे थंड ईशान्यई वारे महाराष्ट्राकडे झेपावत आहे.

- समुद्रसपाटीपासून साडेबारा किमी उंचीपासून ते साडेचार किमी उंचीपर्यंत वरून खाली टप्प्याटप्प्याने सरकलेले वेगवान पश्चिमी अतिथंड कोरड्या वाऱ्यांचा झोत (जेट स्ट्रीम) चा पट्टा उत्तर भारताकडून दक्षिणेपर्यंत रुंदावल्यामुळे महाराष्ट्रात थंडीची तीव्र लाट राहणार आहे.

मंगळवारचे राज्याचे किमान तापमान (अंश सेल्सिअस)

अहिल्यानगर ७.४, पुणे ८.४, अहिल्यानगर ७.४, जळगाव ८.४, महाबळेश्वर १२, मालेगाव ९.२, नाशिक ९.३, सांगली १३.२, सातारा ११.२, सोलापूर १२.४, धाराशिव १२, छ. संभाजीनगर ११, परभणी ११, बीड १०.५, अकोला १०.६, अमरावती १०.६, बुलडाणा १३, ब्रह्मपुरी १२, चंद्रपूर ११.६, गोंदिया ८.६, नागपूर ८.८, वाशीम १०.८, वर्धा ११.२, यवतमाळ ९.२, कोल्हापूर १५.२

यंदाच्या हंगामातील नीचांकी तापमान

पुणे : शहरातील पाषाण भागात मंगळवारी (दि.9) किमान तापमान ८.४ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले, तर शिवाजीनगरचा पारा ८.९ अंशांपर्यंत खाली आला. यंदाच्या हिवाळ्यातील हे नीचांकी तापमान नोंदले गेले.

यंदा नोव्हेंबरमध्ये बंगालच्या उपसागरात दोन चक्रीवादळे आल्यामुळे वातावरणात बाष्पयुक्त वारे दीर्घकाळ होते. त्यामुळे वातावरणात म्हणावी तशी थंडी ऑक्टोबर आणि नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत नव्हती. नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यापासून थंडीची तीव्रता जाणवू लागली. मात्र, फार वेळा तापमान १० अंशांपर्यंत गेले नाही. गार वारे सुटल्याने थंडीचा प्रभाव जाणवत होता. मंगळवार (दि.८ डिसेंबर)पासून मात्र किमान तापमानात मोठी घट झाली. पारा १४ अंशांवरून ८.४ अंशांपर्यंत खाली आला, असे वातावरण शहरात १९ डिसेंबरपर्यंत राहणार असल्याचा अंदाज आहे.

मंगळवारचे किमान तापमान...

पाषाण ८.४, शिवाजीनगर ८.९, कोरेगाव पार्क ८.९, लोहगाव १४.७, चिंचवड १४.७, लवळे १६.३, मगरपट्टा १६.२.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT