

पुणे : जेसीबी मशिनचे लोखंडी बकेट डोक्यात पडून कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना कोरेगाव पार्क भागात घडली. दुर्घटनेस जबाबदार ठरल्याप्रकरणी जेसीबी चालकाविरुद्ध कोरेगाव पार्क पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
राहुल अनिल गोसावी (वय ३८, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) असे मृत्युमुखी पडलेल्या कामगाराचे नाव आहे. तर अपघातास जबाबदार ठरल्याप्रकरणी जेसीबी चालक अक्षय झोंबाडे (वय २५, रा. उरुळी कांचन, पुणे- सोलापूर रस्ता) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत राहुल गोसावी याची आई कावेरी (वय ५८) यांनी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरेगाव पार्क भागातील 'डम्पिंग यार्ड' परिसरात राहुल गोसावी काम करत होता. सोमवारी (८ डिसेंबर) दुपारी एकच्या सुमारास काम करत असताना जेसीबी मशिनचे पाठीमागील लोखंडी बकेट डोक्यात पडल्याने राहुल गंभीर जखमी झाला.
त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती डाॅक्टरांनी दिली. सहायक पोलिस निरीक्षक निमकर तपास करत आहेत.