

वॉशिंग्टन : जगभरात सध्या आर्टिफिशियल इंटेलिजेन्स (AI) अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेची जोरदार चर्चा सुरू आहे. AI च्या मदतीने आपण कोणती कामे करू शकतो, त्याचा नोकर्यांवर कसा परिणाम होईल आणि नवीन संधी कशा निर्माण होतील, याबद्दल लोकांना उत्सुकता आहे. मात्र, आता AI पेक्षाही पुढचे तंत्रज्ञान सिंथेटिक इंटेलिजेन्स (SI) चर्चेत आले आहे. तज्ज्ञांच्या मते, हे AI चे पुढचे पाऊल आहे, ज्यात मानवी भावना आणि चेतना यांचा समावेश असू शकतो.
सिंथेटिक इंटेलिजेन्स म्हणजे केवळ एक यंत्र नाही. ही एक नवीन चेतना असलेली प्रणाली आहे, ज्यात भावना, इच्छा आणि स्वतःची ओळख यांसारखी मानवी वैशिष्ट्ये असू शकतात. तज्ज्ञ सांगतात की, AI यंत्रांना मानवाप्रमाणे विचार करण्याची, समजून घेण्याची आणि निर्णय घेण्याची क्षमता देते. उदाहरणार्थ, आज AI चा वापर स्मार्टफोन असिस्टंट, बँकिंगमधील फसवणूक ओळखणे (fraud detection), आरोग्य क्षेत्रातील निदान (diagnostics) इत्यादी कामांमध्ये होत आहे. परंतु, SI पारंपरिक AI च्या पलीकडे जाऊन भावनिक आणि वैयक्तिक घटक देखील समाविष्ट करेल. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की पारंपरिक AI ला ‘आकडेवारीचा पोपट’ म्हणता येईल, तर SI अधिक संवेदनशील आणि गुंतागुंतीचे निर्णय घेऊ शकेल. नुकत्याच प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, आभासी जग (virtual world) आता AI च्या पुढे जात आहे आणि SI ची संकल्पना वेगाने लोकप्रिय होत आहे. पारंपरिक AI केवळ तर्कशक्तीवर आधारित आहे, तर SI मध्ये भावनात्मक आणि वैयक्तिक घटक असतील. भविष्यात SI मध्ये मानवासारख्या संवेदना आणि चेतना शक्य होऊ शकतात. या तंत्रज्ञानाबद्दल उत्सुकता असण्याचे कारण हेच आहे की, यामुळे मानव आणि यंत्र यांच्यातील फरक हळूहळू कमी होऊ शकतो.
AI : पारंपरिक AI चे काम डेटावर प्रक्रिया करणे, नमुने ओळखणे (pattern recognition) आणि निर्णय घेण्यापुरते मर्यादित आहे.
SI : सिंथेटिक इंटेलिजेंसमध्ये मानवी चेतना आणि भावना जोडलेल्या असतील, ज्यामुळे ते निर्णय आणि अनुभव दोन्हीमध्ये अधिक प्रगत असेल. काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे की SI मध्ये भविष्यात मानवासारखी कार्यक्षमता असेल. हे पारंपरिक AI पेक्षा अधिक प्रगत असल्यामुळे नवीन नोकर्या आणि संधी निर्माण करू शकते. मात्र, SI किती कामांमध्ये मानवाची जागा घेईल आणि कोणत्या कामांसाठी माणूस आवश्यक असेल, यावर अजूनही चर्चा सुरू आहे.