

पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकातील इयत्ता ८ वीतील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षेचे (एनएमएमएस) रविवार २८ डिसेंबरला आयोजन करण्यात आले असून प्रवेशपत्रे परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in व https://mscerumms.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.
एनएमएमएस परीक्षा महाराष्ट्रात एकूण ७५८ केंद्रावर घेण्यात येणार असून परीक्षेसाठी राज्यातून १३ हजार ७८९ शाळा व एकूण २ लाख ५० हजार ५४४ विद्यार्थ्यांची नोंदणी केली आहे. ही प्रवेशपत्रे विद्यार्थ्यांस उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांची असेल.
प्रवेशपत्रात विद्यार्थ्यांचे नाव, वडीलांचे नाव, आडनाव, आईचे नाव यामधील स्पेलिंग दुरुस्ती असल्यास तसेच जन्मतारीख, जात, आधारकार्ड आदींमध्ये दुरुस्ती असल्यास दुरुस्तीसाठी २७ डिसेंबर पर्यंत संबंधित शाळेच्या लॉगिनमध्ये ऑनलाईन अर्ज उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. कोणत्याही परिस्थितीत पूर्ण नावात बदल केला जाणार नाही.
ऑनलाईन आलेल्या अर्जाव्यतिरिक्त टपाल, समक्ष अथवा ईमेल आदी कोणत्याही पद्धतीने पाठविलेल्या दुरुस्त्या तसेच मुदतीनंतर प्राप्त झालेल्या दुरुस्ती अर्जांचा विचार केला जाणार नाही असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.