पुणे: पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर गेल्या दोन दिवसांपासून विमानांच्या वेळापत्रकात मोठा व्यत्यय निर्माण झाला आहे. गेल्या काही दिवसात इंडिगोच्या उड्डाणांच्या मोठ्या प्रमाणात विलंब आणि रद्द होण्याच्या घटनांमुळे प्रवाशांना गंभीर गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. यासाठी इंडिगोकडून नवीन लागू झालेली पायलट ड्युटी नियमावली (एफडीटीएल), विश्रांतीबाबतचे सुधारित नियम, क्रूची कमतरता, तांत्रिक बिघाड, विमानतळांवरील ट्रॅफिक कंजेशन, चेक-इन प्रणालीतील अडचणी, प्रतिकूल हवामान, तांत्रिक समस्या आणि इतर ऑपरेशनल बाबी यासारखी अनेक कारणे देण्यात आली आहेत. परंतु असे प्रामुख्याने पुढे आले आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणावर अचानक सेवा विस्कळीत होण्याचे मुख्य कारण हे कॉकपिट क्रू म्हणजेच पायलट ची कमतरताच आहे.
इंडिगो एअरलाइन्सच्या ऑपरेशनल त्रुटींमुळे विमानसेवा ठप्प झाली असून, केवळ दोन दिवसांत तब्बल 38 विमाने रद्द करावी लागली आहेत. यामुळे हजारो प्रवाशांचे वेळापत्रक कोलमडले असून, विमानतळावर गोंधळाची परिस्थिती आहे. डीजीसीएने गेल्या काही महिन्यात पायलट साठीचे नवीन एफडीटीएल आणि विश्रांतीचे नियम अमलात आणले होते आणि हे नियम संपूर्णपणे एक नोव्हेंबर 2025 पासून लागू करणे एअरलाइन्सवर बंधनकारक होते जे अर्थातच इंडिगोला माहीत होते. म्हणूनच या बदलांचा क्रू उपलब्धतेवर होणारा परिणाम ओळखणे, त्यानुसार आवश्यकतेनुसार मनुष्यबळाची योग्य भरती, त्यांचे रोस्टरिंग इत्यादींचे आवश्यक नियोजन करणे ही इंडिगो व्यवस्थापनाची जबाबदारी होती. जर एअरलाइन्सने यासाठी वेळेवर तयारी केली असती, बदललेल्या गरजेनुसार पायलटची भरती केली असती, बफर पायलट्सची योग्य संख्या उपलब्ध ठेवली असती, हिवाळी वेळापत्रक पायलट व विमान यांच्या वास्तविक उपलब्धतेनुसार सुधारले असते आणि नवीन नियमांशी जुळवून घेण्यासाठी आंतरिक प्रक्रियांमध्ये बदल केले असते, तर ही गंभीर परिस्थिती टाळता आली असती.
त्यामुळे या विस्कळीत सेवेसाठी मोठ्या प्रमाणात इंडिगो व्यवस्थापनाचे नियोजनात झालेले अपयश आणि दूरदृष्टीचा अभाव जबाबदार ठरतो, असे म्हणावे लागेल. इतर एअरलाइन्सनी यासंबंधी वेळीच आवश्यक कारवाई केल्यामुळे त्यांच्या सेवा एवढ्या प्रमाणात प्रभावित झाल्या नाहीत आणि केवळ इंडिगो ची सेवाच एवढ्या मोठ्या प्रमाणात अचानक प्रभावित झाली आहे. हे स्पष्ट दाखवते की, ही समस्या बाह्य घटकांपेक्षा अंतर्गत नियोजनातील त्रुटींमधून निर्माण झाली आहे.
प्रवाशांची गैरसोय व मनस्ताप
अशा गंभीर व अचानक निर्माण झालेल्या परिस्थितीत प्रवाशांचे हित व हक्कांचे संरक्षण करणारे कठोर, स्पष्ट आणि प्रभावी नियमांची भारतीय हवाई वाहतूक क्षेत्रात मोठी आवश्यकता आहे. जेव्हा उड्डाणे रद्द किंवा मोठ्या प्रमाणावर विलंबित होतात आणि त्यामागील कारण एअरलाइन्सकडून झालेल्या चुका, अयोग्य नियोजनामुळे किंवा अयोग्य व्यवस्थापना मुळे असते, तेंव्हा प्रवाशांना केवळ तिकीटाची परतफेड न देता त्यांचे झालेले सर्व प्रकारचे नुकसान जसे की, मोठा वेळ वाया जाणे, मानसिक व शारीरिक त्रास, हॉटेल्स, टॅक्सी, पुढील कनेक्टिंग रेल्वे किंवा फ्लाईट, इतर नॉन-रिफंडेबल बुकिंग्सवरील खर्च, व्यावसायिक नुकसान, तसेच इतर आर्थिक तोटा, यासाठी योग्य आणि सक्तीची भरपाई एअरलाइन्सकडून मिळाली पाहिजे.
जगातील अनेक देशांप्रमाणे भारतातही प्रवाशांच्या हितांचे आणि त्यांच्या अधिकारांचे संरक्षण करणारी मजबूत व कडक नियमावली असणे अत्यावश्यक आहे. वेळेवर उड्डाणे करणे ही केवळ एअरलाईन्सची व्यावसायिक जबाबदारी नसून प्रवाशांचा मूलभूत हक्क आहे. म्हणूनच, उड्डाणे - काही अपवादात्मक कारणे सोडल्यास, वेळेवर न झाल्यास प्रवाशांना त्याचे नुकसान भरपाईस्वरूप मिळणे अत्यावश्यक आहे. सध्या भारतात अशा विलंबांसाठी स्पष्ट, कठोर आणि बंधनकारक भरपाईची पुरेशी कायदेशीर तरतूद डीजीसीए च्या सिविल एव्हिएशन रेग्युलेशन्स मध्ये नसल्याने प्रवासी अनेकदा असुरक्षित राहतात आणि त्यांच्या त्रासाची योग्य ती दखल घेतली जात नाही.
विलंबाचे नेमके कारण काय?
या संपूर्ण गोंधळाचे मूळ कारण एकाच एअरलाईनशी जोडलेले आहे. इंडिगो एअरलाइन्सच्या अनेक विमानांना ऑपरेटिंग क्रू सदस्य उपलब्ध नसल्यामुळे ती विमाने जास्त काळ पार्किंग बे मध्ये उभी आहेत. या दीर्घकाळ थांबण्यामुळे विमानतळावरील पार्किंग बे ची उपलब्धता अत्यंत कमी झाली आहे. परिणामी, पार्किंग बे च्या कमतरतेमुळे इंडिगो सह इतर सर्व एअरलाइन्सच्या वेळापत्रकातही मोठा व्यत्यय येत आहे.
दोन दिवसांतील विमानांची आकडेवारी
३ डिसेंबर (काल) - रद्द झालेली विमाने - २२
४ डिसेंबर (आज) - रद्द होणारी अपेक्षित विमाने - १६
एकूण दोन दिवसांत रद्द उड्डाणे - ३८
रद्द झालेल्या उड्डाणांव्यतिरिक्त, आज (४ डिसेंबर) १९ विमानांचे उड्डाण एक तासाहून अधिक विलंबाने होणार आहेत.
प्रशासनाकडून स्थिती पूर्ववत करण्याचे प्रयत्न- प्रवासाला निघण्यापूर्वी एअरलाईनशी संपर्क करा
प्रवाशांची गैरसोय पाहता, पुणे विमानतळ प्रशासनाने तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. टर्मिनल व्यवस्थापन, सुरक्षा (CISF), एटीसी (ATC) आणि ग्राउंड हँडलिंग एजन्सी यांच्याशी समन्वय साधून परिस्थिती सामान्य करण्याचा प्रयत्न सुरू आहे. प्रवाशांचे हित सर्वोच्च प्राधान्य मानून सर्व टीम्स पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत. विमानतळ प्रशासनाने सर्व प्रवाशांना आवाहन केले आहे की, प्रवासाला निघण्यापूर्वी आपल्या संबंधित एअरलाईनशी संपर्क साधून आपल्या विमानाची सद्यस्थिती तपासावी आणि प्रशासनाला सहकार्य करावे.
या पार्श्वभूमीवर, मी केंद्र सरकार आणि केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालयाला पुन्हा एकदा अपील करतो की एअरलाइन्स कडून उड्डाणांच्या अवाजवी विलंब अथवा अचानक रद्द झाल्यास एअरलाईन्सनी प्रवाशांना योग्य आणि अनिवार्य भरपाई देणे कायदेशीरदृष्ट्या बंधनकारक करणारे स्पष्ट, कठोर आणि प्रवाशांसाठी न्याय्य नियम तत्काळ लागू करावेत. अशा नियमनामुळे प्रवाशांचे हक्क संरक्षित होतील, एअरलाईन्स अधिक जबाबदार होतील आणि भारतातील विमान वाहतूक व्यवस्थेवरील लोकांचा विश्वास अधिक दृढ होईल.धैर्यशील वंडेकर, हवाई वाहतूक तज्ञ