

ओतूर: एक दुचाकीस्वार आपल्या घरी परतत असताना उसाच्या शेतात अगोदरच दबा धरून बसलेल्या बिबट्याने दुचाकीवर झेप घेत दुचाकी स्वारावर जबर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
दुचाकीस्वाराने वेळीच सावध पवित्रा घेत मोठमोठ्याने आरडाओरड केल्याने आजूबाजूचे शेतकरी तात्काळ घटनास्थळी हजर होत गलका केल्यामुळे रस्त्यावर थांबून राहिलेल्या बिबट्याने पुन्हा उसाच्या शेतात धूम ठोकली मात्र दुचाकीस्वार चालकाच्या पायाला बिबट्याने ओरबाडल्यामुळे त्यास जखमी व्हावे लागले.
ही घटना ही ओतूर (ता. जुन्नर) हद्दीतील अमीरघाट रस्त्यावर बुधवार दि.३ रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली असून सोमनाथ किसन ठिकेकर (वय ५२) रा. ओतूर,(अमीरघाट) असे बिबट्या हल्ल्यात जखमी दुचाकीस्वाराचे नाव आहे.
याबाबतची माहिती स्थानिक नागरिकांनी ओतूर वनविभागाला कळविली असता वनपाल विश्वनाथ बेले, सारिका बुट्टे यांनी आपल्या टीमसह घटनास्थळी तात्काळ धाव घेत जखमी सोमनाथ यास ओतूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी नारायणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे.
दरम्यान शेतावर तसेच वाड्यावस्त्यांवर रहाणाऱ्या नागरिकांनी रात्रीच्या सुमारास विशेष काळजी घेण्याचे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात येत आहे.