

सुनील कडूसकर
भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या डेक्कन जिमखाना-हॅप्पी कॉलनी प्रभागातील (क्र. 29) चार जागांसाठी पूर्वीसारखेच म्हणजे दोन सर्वसाधारण (महिला) प्रवर्ग, एक नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि एक सर्वसाधारण प्रवर्ग, असे आरक्षण पडल्यामुळे माजी नगरसेवकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. तथापि, तिकिटांसाठी इच्छुकांनी आत्तापासून फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे.
एकुण मतदार संख्या : 76,194
स्त्री मतदार : 35,136
पुरुष मतदार : 33,530
एकेकाळी शिवसेनेच्या वर्चस्वाखाली असलेल्या कोथरूड परिसरात सध्या भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री, राज्याचे कॅबिनेट मंत्री, माजी केंद्रीय मंत्री आणि एक महिला खासदार आहेत. या सर्वांचेच काही खास निकटवर्तीय कार्यकर्ते आहेत. त्यामुळे या निष्ठावान इच्छुकांना उमेदवारीबाबत थोडी अधिकच खात्री आहे. त्यातही दादा आणि अण्णांच्या निष्ठावंतांमध्ये अधिक चुरस दिसतेे. नेते आपल्यालाच संधी देतील, असा विश्वास त्यांना वाटत असून, काहींनी तर गाठीभेटी आणि प्रचारासही सुरुवात केली.
विकासकामांचा पाठपुरावा, पक्षनिष्ठा आणि वास्तव्याचे ठिकाण लक्षात घेऊनच पक्षाकडून उमेदवारी दिली जाईल, असे अनेक इच्छुकांना वाटत आहे. तसेच, कोणत्याही कारणास्तव प्रभागाबाहेरच्याला संधी दिली जाऊ नये, अशी त्यांची आग्रही मागणीही आहे. विकासकामांसाठी केलेल्या पाठपुराव्याबरोबरच काही इच्छुक वाढदिवसासह विविध कार्यक्रम आणि उपक्रमांचे फ्लेक्स तसेच संगीत महोत्सवांद्वारे पक्षश्रेष्ठींना, नेत्यांना आणि मतदारांना प्रभावित करण्याचे प्रयत्न करीत असल्याचे दिसून येते.
भाजपच्या इच्छुकांमध्ये उमेदवारीसाठी ‘काँटे की टक्कर’ सुरू असतानाच विरोधी आघाडीकडे मात्र उमेदवारांची शोधाशोध सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून (शरद पवार गट) इच्छुकांची फारशी नावे अद्याप समोर आलेली नाहीत.
शिवसेना (ठाकरे गट), मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (शरद पवार गट) आघाडी होण्याच्या शक्यतेवर पुढील रणनीती ठरणार आहे. या पक्षांची आघाडी होईल, असे त्यांच्या कार्यकर्त्यांना वाटते.
भाजपच्या इच्छुकांची संख्या पन्नासहून अधिक असून, त्यापैकी किमान 15 ते 20 जणांमध्येच मोठी चुरस असल्याचे सांगितले जाते. जयंत भावे, दीपक पोटे, माधुरी सहस्रबुद्धे आणि मंजुश्री खर्डेकर या माजी नगरसेवकांबरोबर भाजपचे शहर महामंत्री पुनीत जोशी, मंदार बलकवडे, प्रशांत हरसुले यांचीही नावे आघाडीवर आहेत. आपल्या कामाच्या जोरावर पक्ष आपल्याला संधी देईल, अशी खात्री त्यांना वाटत आहे. कुलदीप सावळेकर, अमोल डांगे, गिरीश खत्री यांचाही समावेश इच्छुकांमध्ये आहे.
प्रभागातील दोन जागा सर्वसाधारण (महिला) प्रवर्गाच्या वाट्याला आल्याने भाजपच्या अनेक महिला कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. माधुरी सहस्रबुद्धे व मंजुश्री खर्डेकर यांना पक्षाने अनेकदा संधी दिली आहे. त्यामुळे पक्षाकडून यंदा नव्या उमेदवारांना संधी मिळेल, अशी अनेकांना खात्री वाटत असून, त्यासाठी त्यांनी मोर्चेबांधणीही सुरू केली आहे. महिला इच्छुकांमध्ये भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा हर्षदा फरांदे, माजी स्वीकृत सदस्या ॲड. मिताली सावळेकर यांची नावे आघाडीवर असून, वर्षा डहाळ, गायत्री लांडे, अमृता देवगावकर आदींसह इतरही अनेक इच्छुकांची नावे रेसमध्ये आहेत.
शिवसेनेकडून (ठाकरे गट) शहराध्यक्ष गजानन थरकुडे यांच्यासह हेमंत धनवे, वैभव दिघे, अनिल माझिरे हे इच्छुक असल्याचे सांगण्यात येते. तसेच, विविध पक्षांतून राम बोरकर, राजेश पडळकर, वैभव दिघे, सुरेखा होले, उमेश कंधारे, सनी निम्हण, स्नेहल निम्हण यांचीही नावे चर्चेत आहेत.
कोथरूडवर भाजपच्या कोणत्या नेत्याचे वर्चस्व आहे, हे आता उमेदवारीवरूनच निश्चित होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सध्या रंगू लागली आहे.
हिंदु-मराठा : 35 टक्के
हिंदू-बाम्हण : 35 टक्के
इतर : 30 टक्के
मुस्लीम : 1 टक्का
मागास : 5 टक्के