

नारायणगाव : तळेगाव ते उरुळी कांचन या नवीन रेल्वेलाइनला स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध असेल तर सर्वांशी चर्चा करून पर्यायी मार्ग काढता येईल, अशी सकारात्मक भूमिका केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी विचारलेल्या प्रश्नांवर उत्तर देताना स्पष्ट केली.
लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात खासदार डॉ. कोल्हे यांनी पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे आणि तळेगाव ते उरळी कांचन या दोन रेल्वेलाईनसंदर्भात प्रश्न उपस्थित केले. या वेळी बोलताना खा. डॉ. कोल्हे यांनी पुणे-नाशिक रेल्वेची जुनीच अलाइनमेंट कायम ठेवावी, अशी मागणी करताना जगभरात 15 देशात रेडिओ टेलिस्कोप प्रकल्पाच्या परिसरातून रेल्वे जात आहेत. या तंत्रज्ञानाचा अभ्यास करून हा प्रकल्प जुन्याच मार्गाने करता येईल असे सांगितले. त्यावर उत्तर देताना रेल्वेमंत्री वैष्णव यांनी या प्रकल्पांची माहिती सादर करावी. या माहितीचा अभ्यास करू, असे सांगितले.
रेल्वेमंत्री वैष्णव यांनी दिलेल्या उत्तरावर पुरवणी प्रश्न मांडताना खासदार डॉ. कोल्हे यांनी जुन्नर, आंबेगाव हे तालुके निर्यातक्षम कृषी उत्पादन घेणारे तालुके आहेत. त्यामुळे पुणे-नाशिक रेल्वेमार्गामुळे या भागाचा आर्थिक विकास होऊ शकतो. जीएमआरटी प्रकल्पामुळे जुन्नर व आंबेगाव तालुक्यात औद्योगिक विकास होऊ शकत नाही. हे दोन्ही तालुके भारतातच आहेत, त्यांना विकासाचा हक्क नाही का? असा सवाल करत या दोन तालुक्यांतील विकासातील कमतरता, त्रुटी कशाप्रकारे दूर करणार? असे विचारले. त्यावर उत्तर देताना रेल्वेमंत्री वैष्णव यांनी गती-शक्ती योजनेअंतर्गत या दोन्ही तालुक्यांना या नव्या अलाइनमेंटला जोडण्याचा विचार करता येईल, असे सांगितले. त्याचबरोबर तळेगाव ते उरुळी कांचन या नवीन रेल्वेमार्गाच्या अलाइनमेंटला खेड तालुक्यातील स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध असल्याकडे रेल्वेमंत्री वैष्णव यांचे लक्ष वेधून ही अलाइनमेंट बदलण्याची मागणी केली. या मागणीचा सकारात्मक विचार करण्यात येईल, असे सांगून त्यांनी स्थानिक प्रतिनिधी, राज्य सरकार, रेल्वे यांची संयुक्त बैठक घेऊन नवीन आखणी संदर्भात चर्चा करण्याचे सुतोवाच केले.