TB file photo 
पुणे

पु्ण्यात क्षयरोग रोखण्यासाठी 27 ‘टीबी चॅम्पियन’ सज्ज

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा : क्षयरोगातून बरे होण्यासाठी औषधे वेळेवर आणि संपूर्ण घेण्याचे महत्त्व आता डॉक्टरांबरोबरच क्षयरोगावर मात केलेले रुग्णच इतर क्षयरोगी रुग्णांना सांगणार आहेत. क्षयरोगातून बरे झालेले रुग्ण आता या आजाराबाबत समाजात जनजागृती करणार आहेत. या रुग्णांना 'टीबी चॅम्पियन' म्हणून काम करता येणार आहे. पुणे शहरात असे 27 टीबी चॅम्पियन आहेत.

शहरी भागातील झोपडपट्टी भाग, कामगारवस्ती, दाटीवाटी असलेली घरे येथे क्षयरोगाचे रुग्ण जास्त आढळतात. या ठिकाणी संसर्गाची साखळी तुटणे गरजेचे आहे. त्यासाठी शासकीय यंत्रणेने कितीही प्रयत्न केले तरी त्यापेक्षा जे रुग्ण बरे झाले आहेत व त्यांनी जे सांगितले त्यावर त्यांचा विश्वास अधिक बसतो आणि क्षयरोगाबाबत अधिक जागृती तयार करण्यास मदत होते. यावरून क्षयरोग विभागाने टीबी चॅम्पियनची निवड केली आहे.

क्षयरोगाबाबत अजूनही समाजात कलंकितपणाची भावना (स्टिग्मा) आहे. याबाबत जास्त रुग्ण पुढे येत नाहीत आणि सांगतही नाहीत. त्यामुळे, आजारावर उपचार घेण्यासाठी उशीर होतो आणि आजार समाजात पसरत राहतो. परंतु, वेळेवर उपचार घेतला तर रुग्ण पूर्णपणे बरे होतात.

अशी करणार जागृती

टीबी चॅम्पियन हे क्षयरोगाचे ब्रँड अ‍ॅम्बेसिडर म्हणून काम करीत आहेत. यामध्ये त्यांना स्वतः क्षयरोगाची लागण झालेली असावी आणि त्यानंतर त्यांनी वेळेवर औषधे घेतलेली असावे आणि त्यातून ते बरे झालेले असावेत, अशी त्यांची पात्रता अट आहे. हे चॅम्पियन जवळच्या क्षयरोग रुग्णांमध्ये जातील आणि त्यांना तुम्ही वेळेवर औषधे घ्या, तुम्हीही बरे होताल, असा विश्वास देणार आहेत.

500 रुपये मानधन देणार
शहरात पालिकेच्या क्षयरोग विभागाने 27 टीबी चॅम्पियनची निवड केली आहे. हे सर्व रुग्ण क्षयरोगातून बरे झाले असून ते आता त्यांच्या जवळच्या रुग्णांमध्ये जाऊन जनजागृती करत आहेत. ऑनलाइन पद्धतीनेही त्यांचे काम सुरू आहे. त्यासाठी त्यांना प्रत्येक मीटिंगसाठी 500 रुपयांचे मानधनही देण्यात येत आहे. तसेच जितक्या वेळा कार्यक्रम घेतील तितक्या वेळा त्यांना हा निधी मिळणार आहे.

''सध्या शहरात टीबीबाबत जनजागृती करण्यासाठी 27 टीबी चॅम्पियनची नियुक्ती करण्यात आली आहे. या चॅम्पियनची नियुक्ती करण्यासाठी सुरुवातीला कोणी पुढे येत नव्हते. मात्र, आता रुग्ण येत असून ते जनजागृती करण्यासाठी तयार होत आहेत. गेल्या दोन वर्षांपासून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.''

                                                                                                  – डॉ. वैशाली जाधव, क्षयरोग विभागप्रमुख, पुणे मनपा

क्षयरोग रुग्णांची आकडेवारी

वर्ष          एकूण रुग्ण       बरे झालेले           टक्केवारी
2018          4584               3820                    83
2019          7802               6635                    85
2020          5632               4519                    80

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT