मोटरसायकल चोरीचा आरोप : पोलिसांसमोर मुलाच्या बापाने सोडला प्राण | पुढारी

मोटरसायकल चोरीचा आरोप : पोलिसांसमोर मुलाच्या बापाने सोडला प्राण

पैठण; पुढारी वृत्तसेवा: एमआयडीसी पोलिसांनी मोटारसायकल चोरीचा आरोप असलेल्या एका युवकाला अटक करण्यासाठी आल्याची भीतीमुळे युवकाच्या वडिलांनी प्राण सोडल्याची धक्‍कादायक घटना घडली. ही घटना तारु पिंपळवाडी येथे मंगळवारी रात्री दोनच्या सुमारास घडली. शब्बीरभाई शे. इब्राहिमभाई (वय ६०) असे मृत झालेल्‍या वडिलांचे नाव आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, पैठण एमआयडीसी पोलिस ठाण्यामध्ये  मोटारसायकल चोरीतील मुख्य आरोपीने तारु पिंपळवाडी येथील बिलाल शेख या युवकाचे गुन्ह्यात सहभाग असल्याचे नाव सांगितले होते. मंगळवारीच्या मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सपोनि भागवत नागरगोजे, पो. कॉ. चव्हाण हे आपल्या पथकासह बिलाल शेख अटक करण्यासाठी घरी पोहोचले.

पोलिस मध्यरात्री अचानक आल्याने आणि आपल्या मुलाला अटक करून घेऊन जाणार या भीतीने बिलाल शेखचे वडील शब्बीरभाई शे. इब्राहिमभाई (वय ६०) यांना ह्रदयविकाराचा झटका आला. त्यातच त्याच्या मृत्यू झाला. या घटनेमुळे गावातील नागरिक आणि नातेवाईकात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. शब्बीरभाई यांचा मृतदेह बिडकीन येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आलेला आहे.

या घटनेची माहिती मिळताच पैठण उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. विशाल नेहुल, बिडकीनचे सपोनि संतोष माने, वरिष्ठ उपनिरीक्षक छोटू सिंग गिरासे, चौरे, सोनवणे, सचिन भूमे हे घटनास्थळी दाखल झाले आहेत. बिडकीन येथील शासकीय रुग्णालयात नातेवाईकांनी गर्दी केली आहे.

दरम्यान रात्री-अपरात्री चौकशीच्या नावाखाली एमआयडीसी पोलीस पथकाने ज्येष्ठ नागरिकाला धमकी आणि धक्काबुक्की केल्यामुळे घटना घडल्याचा आरोप करून संबंधित पोलिसाची चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी संतप्त नातेवाइकांनी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल नेहुल यांच्याकडे केली आहे.

तात्काळ संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यावर कारवाही जोपर्यंत होत नाही तोपर्यंत अंत्यविधी करणार नाही असा निर्णय संतप्त नातेवाईकांनी घेतला आहे. यानंतर गुन्हा दाखल करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर अंत्यविधी करण्यात येईल, असे नातेवाईकांनी सांगितले.

हेही वाचलंत का? 

Back to top button