फसणवूक  
पुणे

नायजेरीयन ठग वापरताहेत भारतीय खाती

अमृता चौगुले

पुणे : अशोक मोराळे : ऑनलाइन आर्थिक गंडा घातल्यानंतर पैसे ट्रान्स्फर करून घेण्यासाठी नायजेरियन ठग भारतीय नागरिकांची बँक खाती वापरत असल्याचे समोर आले आहे. कमिशन तत्त्वावर नायजेरियन ठगांना बँक खाती वापरण्यासाठी देणारे रॅकेट देशात सक्रिय असल्याची पोलिसांची माहिती आहे.

अटक केलेल्या नायजेरियन गुन्हेगारांकडे अशी बँक खाती आढळून आली आहेत. फसवणूक करून व कमिशन तत्त्वावर अशा दोन पद्धतीने नायजेरियन गुन्हेगार भारतीय नागरिकांची बँक खाती वापरतात. या रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी पुणे सायबर पोलिसांनी आता कंबर कसली आहे.

अटक करण्यात आलेल्या नायजेरियन गुन्हेगारांकडे आढळलेल्या प्रत्येक बँक खात्याची तपासणी पोलिस करीत आहेत. त्यांनी संबंधित बँक खाती कोठून मिळवली, त्याद्वारे ट्रान्झॅक्शन कधी झाली आहेत, त्या खात्यांतून दुसर्‍या कोणत्या खात्यात पैसे वर्ग करण्यात आले आहेत, अशा विविध बाबी तपासून पाहिल्या जात आहेत. नायजेरियन गुन्हेगार वापरत असलेली बँक खाती विविध राज्यांतील आहेत. फेसबुक, विवाह संकेतस्थळे, ओएलएक्स, बँकिंग, ओटीपी अपडेट, फोन पे, गुगल पे, केवायसी अपडेट, नोकरी, लोन, विमा, पर्यटन, फेसबुक हॅकिंग, मैत्री, गिफ्ट, बनावट ग्राहक सेवा केंद्रे, व्यवसाय अशा विविध पद्धतीने नागरिकांना नायजेरियन सायबर चोरटे आपल्या जाळ्यात खेचतात. त्यानंतर प्रलोभन दाखवून या ना त्या कारणातून आर्थिक गंडा घालतात. नायजेरियन गुन्हेगारांकडे केवायसी नसल्यामुळे त्यांना बँक खाती काढता येत नाहीत किंवा त्यांना ती मिळत नाहीत.

दलालाच्या माध्यामातून अशी बँक खाती त्यांना उपलब्ध करून दिली जातात. पुढे याच भारतीय नागरिकांच्या खात्याचा वापर फसवणूक केलेले पैसे ट्रान्स्फर करण्यासाठी हे गुन्हेगार करतात. जमा झालेले पैसे त्यांना देण्यासाठी हे गुन्हेगार काही ठरावीक रोकड संबंधित बँक खातेधारकाला देतात.

संघटित पद्धतीने चालते काम

दिल्लीसह इतर ठिकाणी बसून नायजेरियन गुन्हेगार महाराष्ट्रातील गल्लीबोळातील नागरिकांच्या बँक खात्यावर डल्ला मारत आहेत. टोळीतील प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या पद्धतीने काम करते. नागरिकांचा डेटा मिळवून देण्यापासून ते जमा झालेल्या पैशाची विल्हेवाट कशी लावायची, अशी प्रत्येक कामे ठरलेली असतात. नायजेरियन गुन्हेगारांना भारतीय नागरिकांची बँक खाती मिळवून देण्यासाठी त्यांच्यातील विशिष्ट व्यक्ती काम करतात. गुन्ह्यात अटक केल्यानंतर त्यांच्याकडे फारसे पुरावे मिळत नाहीत. पोलिसांना चकवा देण्याचे काम हे चोरटे अतिशय क्लृप्तीने करतात. डिजिटल पुरावा पाठीमागे राहणार नाही, याची नायजेरियन काळजी घेतात.

गुन्हेगारांनी पॅटर्न बदलला?

अमली पदार्थांच्या तस्करीत नायजेरियन गुन्हेगारांचा अंमल आहे. सध्यादेखील तो कायम आहे. मात्र, सायबर गुन्हेगारीच्या बाबतीत बोलायचे झाले, तर तेथेदेखील त्यांचा बोलबाला वाढतो आहे. सायबर पोलिसांनी केलेल्या कारवाईत आतापर्यंत दिल्ली येथून अनेक नायजेरियन टोळ्यांना अटक झाली आहे. वर्षभरात एकट्या पुणे पोलिसांनी 50 पेक्षा अधिक गुन्हेगारांना अटक केली आहे. कमी कष्टात, कमी कालावधीत अतिशय स्मार्ट पद्धतीने हे गुन्हेगार भारतीय नागरिकांची बँक खाती रिकामी करीत आहेत. अमली पदार्थांच्या तस्करीपेक्षा गिफ्ट फ्रॉड, व्यवसाय, विवाह संकेतस्थळे येथील फसवणुकीत सर्वाधिक पैसे मिळत असल्यामुळे त्यांनी सायबर गुन्हेगारीकडे आपला मोर्चा वळविल्याचे दिसून येते. त्यामुळे नायजेरियन गुन्हेगारांनी गुन्हेगारीचा पॅटर्न तर बदलला नाही ना, असा सवाल निर्माण होतो आहे.

कोट्यवधींची हेराफेरी

एकंदर मागील काही दिवसांपूर्वी पुणे शहरात घडलेल्या सायबर गुन्ह्यांचा विचार केला, तर मैत्रीच्या बहाण्याने असो की विदेशातील महागडे गिफ्ट सोडवून घेण्याचा प्रकार, अशा विविध गुन्ह्यांत कोट्यवधींचा गंडा महिलांना नायजेरियन गुन्हेगारांनी घातला आहे. देशात नायजेरियन कोट्यवधींची फसवणूक करीत आहेत. जमा झालेला हा पैसे विविध भारतीय नागरिकांच्या बँक खात्यांतून एकत्र केला जातो आहे. अनेकदा फसवणूक झाल्यानंतरदेखील नागरिक बदनामीच्या भीतीपोटी तक्रार देण्यास समोर येत नाहीत. त्यामुळे हा आकडा किती कोटींच्या घरात असेल, याची कल्पना न केलेलीच बरी.

''नायजेरियन गुन्हेगार गुन्हे करण्यासाठी भारतीय नागरिकांची बँक खाती वापरत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यांच्याकडे आढळलेल्या बँक खात्यांचा तपास पोलिस करीत आहेत. कमिशन व फसवून घेतलेल्या खात्यांचा वापर ते करीत आहेत. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता आपले बँक खाते कोणाला वापरण्यास देऊ नये. त्याचा गैरवापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.''

                                                                                                                  डी. ए. हाके, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सायबर

  • कमिशन तत्त्वावर बँक खाती पुरविणारे रॅकेट सक्रिय
  • छडा लावण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली
  • आढळलेल्या बँक खात्यांची तपासणी करणार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT