कोल्हापूर विधान परिषद निवडणूक : सतेज पाटील यांची बिनविरोध निवड, अमल महाडिक यांची माघार | पुढारी

कोल्हापूर विधान परिषद निवडणूक : सतेज पाटील यांची बिनविरोध निवड, अमल महाडिक यांची माघार

कोल्हापूर : सतीश सरीकर

भाजप-काँग्रेस-शिवसेना यांच्यात विधान परिषद निवडणुकीसाठी समझोता एक्स्प्रेस धावली. दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणूक बिनविरोध करण्यावर अखेर शुक्रवारी शिक्कामोर्तब झाले. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यावेळी प्रमुख उपस्थित होते. त्यानुसार कोल्हापूर विधान परिषदेतील भाजपचे उमेदवार अमल महाडिक व डमी उमेदवार शौमिका महाडिक यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची सूचना भाजपच्या कमांडकडून करण्यात आली. परिणामी काँग्रेसचे उमेदवार व पालकमंत्री सतेज पाटील यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कोल्हापूर विधान परिषद निवडणुकीत बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला.

दरम्यान, भाजपच्या दिल्लीतील वरिष्ठांकडून महाडिक यांना विधान परिषद निवडणुकीतून माघार घेण्याची सूचना आल्यानंतर महाडिक कुटुंबीय आणि समर्थकांची बैठक झाली. या बैठकीत महाडिक यांनी पक्षाचा आदेश मानत माघार घेण्याचा निर्णय घेतला. कोल्हापुरात पालकमंत्री सतेज पाटील व माजी आमदार अमल महाडिक या पारंपारीक कट्टर विरोधकांत इर्षेची लढाई सुरू होती. गेल्या काही दिवसांपासून कोल्हापुरातील राजकीय वातावरण तापले होते. जिल्ह्यावर राजकीय वर्चस्वासाठी पाटील व महाडीक यांच्यात गेल्या काही वर्षापासून हाडवैर निर्माण झाले आहे. राजकीय वर्चस्वासाठी पाटील व महाडिक यांच्यात प्रचंड टोकाचे राजकारण सुरू आहे. २०१५ मध्ये तत्कालीन गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांचा अमल महाडिक यांनी विधानसभा निवडणूकीत दारूण पराभव केला होता. त्यानंतर काही महिन्यात झालेल्या विधान परिषद निवडणुकीत तत्कालीन आमदार महादेवराव महाडिक यांचा सतेज पाटील यांनी पराभव करून बदला घेतला होता. पाटील यांचे पुतणे ऋतुराज पाटील यांनी अमल महाडिक यांना पराभवाची धूळ चारली होती. आता पुन्हा सतेज पाटील व अमल महाडीक विधान परिषद निवडणुकीत आमने-सामने आले होते. दोघांत तुल्यबळ लढतीमुळे गेल्या काही दिवसांपासून रणधुमाळी सुरू होती. आरोप-प्रत्यारोपाचा फैरी झडत होत्या. काटाजोड लढतीमुळे एकेक मतासाठी साम, दाम, दंड, भेद आदींचा वापर केला जात होता. परंतू निवडणूक बिनविरोधचा निर्णय झाल्याने कोल्हापूरची जागा काँग्रेसला सोडण्याचा निर्णय भाजपने घेतला. बिनविरोधची समझोता एक्स्प्रेस यशस्वी झाल्याने सतेज पाटील यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले. निवडणूक बिनविरोध झाल्यामुळे  निवडणुकीतील हवा निघून गेली.

दिल्लीत खलबते….

महाराष्ट्राची राजकीय संस्कृती पाहता विधान परिषद निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठीही प्रयत्न सुरू होते. भाजप-काँग्रेस-शिवसेनेत समझोता एक्स्प्रेससाठी प्रयत्न सुरू होते. काँग्रेसकडून प्रस्ताव गेल्याने भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांनी गुरूवारी रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. माजी मुख्यमंत्री देवेंद्रे फडणवीस-काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस विधीमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांच्यातही खलबते सुरू होती. भाजपला तीन व काँग्रेस दोन आणि शिवसेना दोन यावर तोडगा काढला जात होता. फक्त नागपूरबाबत भाजप आग्रही असल्याने रात्री उशिरापर्यंत चर्चेच्या फेऱ्या सुरू होत्या. विशेष म्हणजे महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूरमधील जागेचाही बिनविरोधमध्ये समावेश होता. चर्चेच्या अनेक फेऱ्यानंतर शुक्रवारी महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या सर्वच निवडणूका बिनविरोध करण्याचे ठरले.

दरम्यान, गेल्या काही दिवसापासून विधान परिषद निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठीही प्रयत्न सुरू होते. दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या पत्नी डॉ. प्रज्ञा सातव यांना काँग्रेसने उमेदवारी दिल्यानंतर प्रदेशाध्यक्ष पटोले व मंत्री थोरात यांनी भाजपचे नेते व माजी मुख्यमंत्री फडणवीस, प्रदेशाध्यक्ष पाटील यांची भेट घेऊन बिनविरोध करण्याची विनंती केली होती. काँग्रेसच्या विनंतीला मान देऊन भाजपने संजय केनेकर यांचा उमेदवारी अर्ज मागे घेऊन डॉ. सातव यांची बिनविरोध निवड केली. त्यानंतर मुंबईतील नगरसेवकांचे बलाबल पाहता शिवसेनेचे सुनिल शिंदे व भाजपचे राजहंस सिंह यांच्या जागाही बिनविरोध करण्यात आल्या. मुंबईमधील एक आणि धुळे व नागपूर अशा तीन जागा भाजपला तर डॉ. सातव यांच्यासह कोल्हापूरची जागा काँग्रेसला सोडण्याचे ठरले.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : भारतातील पहिलं पॉड हॉटेल सुरू झालय मुंबई सेंट्रलला | Pod Hotel Mumbai | Mumbai Travel Vlog

Back to top button