Mulshi Dam Pudhari
पुणे

Mulshi Dam: पुणेकरांना मुळशी धरणातून सात टीएमसी पाणी; शहराच्या पाणीप्रश्नावर मोठा दिलासा

जलसंपदा विभागाची मान्यता, अनेक वर्षांची मागणी अखेर पूर्ण; पिण्याच्या पाण्यासाठी नवा मार्ग मोकळा

पुढारी वृत्तसेवा

पुणे : पुणेकरांना पिण्यासाठी आता मुळशी धरणामधून सात टीएमसी पाणी मिळणार आहे. त्यासाठी आवश्यक असलेली मान्यता जलसंपदा विभागाने दिली आहे. दरम्यान, याबाबतचा प्रस्ताव कृष्णा खोरे विकास महामंडळाकडून राज्य सरकारकडे पाठविला जाणार आहे. या निर्णयामुळे शहराला मोठा दिलासा मिळणार आहे.

पुणे शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता खडकवासला प्रकल्पातून देण्यात येत असलेले पाणी अपुरे पडत आहे. त्यासाठी मुळशी धरणातून वाया जाणारे पाणी बिगरसिंचनासाठी वापरता येईल, असा आग्रह उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी अनेक वर्षांपासून लावून धरला आहे. अखेर या प्रयत्नांना यश आले असून, मुळशी धरणातून वाया जाणार्‍या सुमारे सात टक्के टीएमसी पाण्याचा वापर करण्यास जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता हनुमंत धुमाळ यांनी मान्यता दिली आहे.

याचा सविस्तर प्रस्ताव कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांकडे पाठविण्यात आला आहे. कार्यकारी संचालकांनी हा प्रस्ताव मान्य करून राज्य शासनाकडे पाठवावा, असे आवाहन करण्यात आले आहे. शासनाची मान्यता मिळाल्यानंतर प्रकल्पाचा प्राथमिक अन्वेषण अहवाल मान्य करून त्यानंतर त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल जलसंपदा विभागाकडून तयार करण्यात येणार आहे.

मुळशी धरणावरून टाटा हायड्रो पावर कंपनीमार्फत भीरा जलविद्युत प्रकल्पासाठी पाणी वापरले जाते. प्रकल्पाचा एकूण जिवंत पाणीसाठा 18.47 टीएमसी इतका आहे, तर मृत साठा 8.12 टीएमसी इतका आहे. या पाण्यातून तीनशे मेगावॅट वीजनिर्मिती करण्यासाठी सहा संच वापरण्यात येत आहेत. मुळशी प्रकल्पाच्या भीरा जलविद्युत केंद्रातील 24 टीएमसी वार्षिक पाणीवापरापैकी जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यांत उपलब्ध होणार्‍या 17 टीएमसी पाण्याद्वारे जास्तीत जास्त वीजनिर्मिती करून उर्वरित सात टीएमसी पाणी वापर 15 ऑक्टोबरच्या 18.50 टीएमसी पाणीसाठ्यातून आठ महिन्यांमध्ये वीजनिर्मितीसाठी करता येणार आहे.

तर, 1.65 टीएमसी बोगदा प्रकल्पासाठी व उर्वरित 9.85 टीएमसीपैकी बाष्पीभवन वजा जाता शिल्लक सात पीएमसी पाणी पूर्वेकडे वळवता येणार असल्याचा अहवाल मुख्य अभियंता हनुमंत धुमाळ यांनी दिला आहे. सात टीएमसी पाण्याचा वापर करण्यासाठी जलसंपदा विभागाने दोन पर्याय दिले आहेत. पुणे महापालिका, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण तसेच पिंपरी-चिंचवड महापालिकेने शासनाकडून या धरणातील पाणीवापराची मान्यता घेऊन सध्याच्या पाइपलाइनच्या जागेवर स्वखर्चाने मुळशी प्रकल्पातून पाणीपुरवठ्यासाठी पाइपलाइन तयार करणे, दुसरा पर्याय मुळशी ते खडकवासला धरणापर्यंत 30 किलोमीटर लांबीचा बोगदा तयार करून पाणी खडकवासला प्रकल्पात आणणे.

वीज तयार करता येईल

मुळशी धरणातून पाणी मिळावे, यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे अनेक वर्षांपासून पाठपुरावा करीत आहेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असून, त्यासाठी तीस टीएमसी पाण्याची मागणी वाढणार आहे. त्यामुळेच टाटांच्या मुळशी व ठोकळवाडी धरणातील पाणी वीजनिर्मितीऐवजी पिण्यासाठी द्यावे. पाण्याऐवजी सौरऊर्जा आणि अणुऊर्जा यांसारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून वीज तयार करता येईल, असा पर्याय पवार यांनी सुचविला होता.

प्रस्‍ताव कार्यकारी संचालकांकडे पाठविला

मुळशीतील अतिरिक्त पाण्याचा वापर पिण्यासाठी करता येईल, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 24 मार्च रोजी आढावा बैठक घेतली होती. त्यानंतर जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी वेळोवेळी विभागासोबत बैठका घेऊन 13 ऑगस्ट रोजी मुळशी धरणातून सात टीएमसी पाणी सिंचन व बिगरसिंचनासाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार हा प्रस्ताव कार्यकारी संचालकांकडे पाठविण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT