चाकण: खेड तालुक्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनिमित्त मोठ्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. खेड तालुक्यात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका लढविताना माजी आमदार दिलीप मोहिते यांच्या विरोधात सर्वपक्षीयांची मोट बांधण्याचे प्रयत्न सुरू होते. ही मोट कितपत यशस्वी होते यावरच विजयाचा गुलाल अवलंबून आहे. (Latest Pune News)
राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही मंडळींनी देखील आमदार बाबाजी काळे यांच्या सोबत येण्याची भूमिका घेतली आहे. खेड तालुक्यात माजी आमदार दिलीप मोहिते-पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीट वाटपात महत्त्वाची भूमिका असणार आहे. खेड तालुक्यात आमदार बाबाजी काळे यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय मोट बांधण्याच्या प्रयत्नांना यश येणार का? याबाबत मोठा संभम आहे. माजी आमदार दिलीप मोहिते यांच्या विरोधात सर्वपक्षीयांची मोट बांधण्यात अपयश आल्यास दिलीप मोहिते पुन्हा आपला करिष्मा दाखविण्याचा आटोकाट प्रयत्न करण्याची शक्यता आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत माजी आमदार मोहिते यांनी करिष्मा दाखविल्यास उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून देखील माजी आमदार मोहिते यांना अधिकचे बळ दिले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वपक्षीयांची आघाडी होऊ न देण्याची राजकीय मांडणी करण्यात माजी आमदार मोहिते यांना कितपत यश मिळणार यावरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा गुलाल कुणाच्या वाट्याला येणार हे निश्चित होणार आहे. खेड तालुक्यात गट-गणांची पुनर्रचना झाल्याने इच्छुकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. खेड तालुक्यात यापूर्वी 7 जिल्हा परिषद गट आणि 14 पंचायत समितीचे गण होते.
नव्या प्रारूप रचनेनुसार तालुक्यात 8 गट आणि 16 गण अस्तित्वात आले आहेत. या प्रारूप मतदारसंघात मोठे बदल झाल्याने इच्छुकांचे धाबे दणाणले आहेत. चाकण परिसरातील मेदनकरवाडी जिल्हा परिषद गट नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित आहे. कुरुळी जिल्हा परिषद गट सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गणात नव्याने आलेली गावे आणि वगळलेली गावे यामुळे अनेक इच्छुक अजूनही संभमात आहेत. खेड तालुक्यात पंचायत समितीचे सभापती पद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित आहे. त्यामुळे सक्षम महिला देण्याकडे प्रमुख पक्षांचा कल आहे.
चाकण परिसरातील काळूस पंचायत समिती गणात वडगाव तर्फे खेड, चांडोली, शिरोली, संतोषनगर, वाकी बुद्रुक, काळूस, खरपुडी खुर्द गावे आहेत. तर पाईट पंचायत समिती गणात हेंद्रुज, तोरणे बुद्रुक, पराळे, अहिरे, पाईट, रौंधळवाडी, तळवडे, कोये, धामणे, कुरकुंडी, आसखेड बुद्रुक, किवळे, कोरेगाव बुद्रुक, चांदूस, पिंपरी बुद्रुक आदी गावांचा सामावेश आहे.आंबेठाण पंचायत समिती गणात गडद, कोळिये, देशमुख वाडी, वहागाव, शिवे, वाकी तर्फे वाडा, करंजविहिरे, आसखेड खुर्द, शेलु, भांबोली, कोरेगाव खुर्द, वराळे, बोरदरा, आंबेठाण, गोनवडी, पिंपरी खुर्द, रोहकल, वाकी खुर्द ही गावे आहेत. तसेच महाळुंगे पंचायत समिती गणात कान्हेवाडी तर्फे चाकण, सांगुर्डी, खालुंबे, महाळुंगे, सावरदरी, शिंदे, वासुली, येलवाडी ही गावे आहेत.
नाणेकरवाडी पंचायत समिती गणात नाणेकरवाडी, खराबवाडी, बिरदवडी ही गावे आहेत. तसेच याच जि. प. गटातील मेदनकरवाडी पंचायत समिती गणात रासे, मेदनकरवाडी, कडाचीवाडी ही मोठ्या लोकसंख्येची गावे आहेत. पिंपळगाव तर्फे खेड पंचायत समिती गणात चिंचोशी, पिंपळगाव तर्फे खेड, दौंडकरवाडी, दावडी, कनेरसर, बहुळ, साबळेवाडी गावे आहेत. तर मरकळ पंचायत गणात भोसे, शेलगाव, शेलगाव, कोयाळि तर्फे चाकण, वडगाव घेनंद, मरकळ, सिद्धेगव्हाण ही गावे आहेत.
जिल्हा परिषद गट कुरुळीमधील आळंदी ग्रामीण पंचायत समिती गणात चऱ्होली खुर्द, आळंदी ग्रामीण धानोरे, सोळू, केळगाव, गोलेगाव, पिंपळगाव तर्फे चाकण ही गावे असून कुरुळी पंचायत समिती गणात निघोजे, मोई, चिंबळी, कुरुळी ही मोठ्या लोकसंख्येची गावे आहेत. चाकण परिसरातील मेदनकरवाडीमध्ये मागास प्रवर्ग हे आरक्षण आहे. काळुस पंचायत समिती गणामध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग, पाईट - नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, आंबेठाण - सर्वसाधारण महिला, महाळुंगे - सर्वसाधारण महिला, नाणेकरवाडी - अनुसूचित जाती महिला, कुरुळी - नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, आळंदी ग्रामीण - सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आरक्षण सोडतीमुळे अनेक प्रस्थापित इच्छुक आणि विद्यमान सदस्यांचे गट आरक्षित झाले आहेत. काही ठिकाणी नव्या इच्छुकांना संधी मिळणार असल्याने आगामी जिल्हा परिषद निवडणूक चुरशीची होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. ज्यांचे गट आरक्षित झाले आहेत, त्यांना आत नवा गट शोधावा लागणार आहे. त्या ठिकाणी त्यांना मोर्चेबांधणी करावी लागेल. अशा वेळी एकाच गटात अनेक जण इच्छुक असणार आहेत. त्यातून आता राजकीय पक्षांना मार्ग काढावा लागणार आहे.
सौभाग्यवतींना उतरावे लागणार मैदानात
चाकण परिसरातील जिल्हा परिषद गटात आणि पंचायत समिती गणात अनेक ठिकाणी इच्छुक उमेदवारांना आपल्या सौभाग्यवतीना उभे करावे लागणार आहे. या भागातील काही गटासह गण देखील आरक्षित झाल्याने इच्छुकांचा हिरमोड झाला आहे. काही प्रवर्गातील प्रबळ उमेदवार शोधण्यासाठी राजकीय पक्षांना कसरत करावी लागणार आहे. चाकण औद्योगिक पट्ट्यातील मेदनकरवाडी-काळुस गट, नाणेकरवाडी-म्हाळुंगे गट आणि कुरुळी-आळंदी ग्रामीण गटासह याच गटांच्या अंतर्गत असलेल्या पंचायत समिती गणातील निवडणुका लक्षवेधी होणार आहेत. स्थानिक कार्यकर्त्यांची ताकद आणि संपर्क यावरच कोण बाजी मारणार हे निश्चित होणार आहे.