

निमोणे : निमोणे (ता. शिरूर) परिसरात बिबट्यांचा वावर नवीन नाही. मात्र, एकाच वेळी पाच पूर्ण वाढ झालेल्या बिबट्यांची टोळी दिसून आली आहे. त्यामुळे निमोणेकरांसह परिसरातील नागरिकांत घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.(Latest Pune News)
या परिसरात सतत एखाद-दुसरा बिबट्या दिसत असतो, ही बाब येथील नागरिकांच्या सवयीची झालेली आहे. दरम्यान, शिरूर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात एकाच आठवड्यात बिबट्याच्या हल्ल्यात मुलगी आणि वृद्ध महिलेला जीव गमवावा लागला आहे. यातून येथील नागरिक सावरलेले नाहीत. त्यातच शनिवारी (दि. 25) रात्री आठ-साडेआठच्या सुमारास निमोणे - मोटेवाडी रस्त्यावरील मोरकडा भागात एकाच वेळी पाच बिबटे आढळून आले आहेत. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे येथील नागरिकांची पाचावर धारण बसली आहे. निमोणे गावचे माजी सरपंच नानासाहेब काळे यांच्या घरामागील मोकळ्या शेतात एकाच वेळेला पाच पूर्ण वाढ झालेली बिबटे ठाण मांडून बसले होते. परिसरातील नागरिकांनी एकत्र येत चारचाकी, ट्रॅक्टरच्या प्रखर उजेडात बिबट्याला हाकलून लावण्याचा प्रयत्न केला. मात्र ते बिबटे तब्बल दोन तास कोणालाच दाद देत नव्हते. त्यातून हे बिबटे किती निर्ढावलेले आहेत हेच दिसून येत असल्याचे नागरिक सांगतात.
या परिसरात आता झुंडीने बिबट्या दिसू लागल्याने नागरिक दहशतीखाली वावरत आहेत. चार-पाच बिबटे एकच वेळेला दिसू लागल्याने बिबट्यांची संख्या नेमकी किती हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या बिबट्यांचा बंदोबस्त करा, नाहीतर आमचे दुसरीकडे कुठेतरी पुनर्वसन करा अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली. वन विभागाने विशेष मोहीम राबवून तातडीने पिंजरे लावून बिबट्यांना जेरबंद करावे. अन्यथा या भागात पुन्हा मोठा अनार्थ घडेल, अशी भीती माजी सरपंच विजय भोस यांनी व्यक्त केली.