

भीमा: आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिरूर-हवेली मतदारसंघातील वेगवेगळ्या गावात मतदारयादीमध्ये हजारो बोगस नावांची नोंदणी झालेली आहे. या प्रकरणाची विशेष तपास पथक नेमून सविस्तर चौकशी करावी, तसेच संबंधित अधिकारी, कर्मचारी व मतदारमाफीयाविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल करावेत. याबाबत येत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून कडक भूमिका घेणार असल्याचे प्रतिपादन माजी आमदार ॲड. अशोक पवार यांनी शिक्रापूर येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात केले. (Latest Pune News)
या वेळी ॲड. पवार म्हणाले, मतदार यादीची सविस्तर माहिती मिळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे 20 पेक्षा अधिकवेळा पत्रव्यवहार केलेला आहे. त्यापैकी एकाच पत्राचे उत्तर आले. शिरूर-हवेली मतदारसंघात मतदारमाफीयांनी प्रत्येक प्रभागात आपापले नातेवाईक, हितचिंतक आणि कार्यकर्त्यांची नावे नोंदवली आहेत. मतदारसंघाच्या बाहेरील नावांची मोठी संख्या आहे. काही प्रभागांमध्ये बनावट मतदार आहेत.
निवडणूक जिंकण्यासाठी हे षडयंत्र सुरू आहे. ठरावीक एजन्सीला रकमेचे पॅकेज देऊन हजारो नागरिकांची बोगस नावे मतदार यादीत नोंद केली आहेत. या विषयाचे अनेक पुरावे आम्ही गोळा केले आहेत. विधानसभेच्या निवडणुकीला पराभवाचे आत्मपरीक्षण केले तर पराभवाचे उत्तर सापडत नाही. निवडणूक शाखेतील काही अधिकारी, बीएलओ व कर्मचारी यांच्या संगनमताशिवाय हे शक्य नाही. यामुळे बोगस मतदान आणि बोगस नोंदणी करताना आढळल्यास तत्काळ अटक करून कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी या वेळी केली.
बोगस मतदार नोंदणी करणार्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी मतदार यादी अभ्यास करून सील करावी. यावर कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी बारीक लक्ष ठेवावे. पक्षाचे बीएलए नेमावेत, असे आवाहन माजी आमदार अशोक पवार यांनी मेळाव्यातील उपस्थित कार्यकर्त्यांना केले.
या वेळी खा. अमोल कोल्हे, पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम, घोडगंगा कारखान्याचे उपाध्यक्ष पोपट भुजबळ, तालुकाध्यक्ष विश्वास ढमढेरे, संजय जगताप, डॉ. पवन सोनवणे, राहुल करपे, मुझफ्फर कुरेशी, पूजा भुजबळ यांची भाषणे झाली. दत्तात्रेय हरगुडे, पंडित दरेकर, संभाजी भुजबळ, बाबा सासवडे ,सोमनाथ भुजबळ आदी मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन संपत ढमढेरे यांनी केले तर आभार तालुका अध्यक्षा विद्या भुजबळ यांनी मानले.