

पुणे : परराज्यातील कामगारांना एटीएममधून पैसे काढताना हेरून त्यांना पोलिस असल्याचा धाक दाखवून लुटणाऱ्या तोतया पोलिसाला अखेर बाणेर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसाचा धाक दाखवून पुन्हा लुटमारीच्या तयारीत असतानाच त्याला ताब्यात घेण्यात आले. श्रीराम विकास हानवते (33,रा. एलिगंट रेसीडेन्सी, एक्सपिरीया मॉलशेजारी, यमुनानगर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. (Latest Pune News)
याबाबत किसनकुमार पोरराराम धुव (27, रा. पाषाण) याने दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 19 ऑक्टोबर रोजी बाणेर येथील पासपोर्ट कार्यालयासमोर दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडला.
तक्रादार पुण्यात बांधकाम कॉन्ट्रक्टर म्हणून काम करतात. ते दि. 19 ऑक्टोबर रोजी त्यांच्या मेव्हणा व मित्र विजयकुमार चव्हाण यांच्यासोबत बाणेर भागात पायी फिरत होते. त्यावेळी त्यांनी बँकेच्या एटीएममधून आठ हजार रुपये दिवाळी खरेदीसाठी काढले. त्यानंतर तिघे बाणेरमधील पासपोर्ट कार्यालयापासून चालत जात असताना एक खाकी रंगाचे जॅकेट, पांढऱ्या रंगाची फुलपॅन्ट, पायात काळ्या रंगाचा पोलिस बूट घातलेला व डोक्यावर हेल्मेट असलेला एक जण बर्गमन स्कूटरवर व त्यांच्याजवळ आला. त्याने त्यांना पोलिस असल्याचे सांगितले. त्यावेळी त्याने तिघांवर चोर असल्याचा संशय घेऊन तुम्ही चोरी केली आहे असा आरोप केला. त्यानंतर झडती घ्यायची आहे म्हणून तुमचे नाव सांगा, आधारकार्ड द्या अशी मागणी केली.
तुम्ही पळून जाण्याचा प्रयत्न केला तर गोळी घालीन अशी धमकी त्याने दिली. यावेळी झडतीच्या नावाखाली त्यांच्या खिशातील तेरा हजार रुपये काढून घेतले. त्याने तक्रारदारांना त्याच्या दुचाकीवर बसवले व दोघांना पोलिस ठाण्यात येण्यास सांगितले. त्यानंतर तक्रारदाराला तुमच्या आधारकार्डची झेरॉक्स काढावी लागेल म्हणून एका बोळीत नेले. तेथे गाडीवरून खाली उतरण्यास सांगून तो तोतया त्याच्या दुचाकीवरून पळून गेला. त्यानंतर त्याने 112 नंबरला कॉल केला. काही मिनिटात पोलिस तेथे आले. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. सीसीटीव्ही फुटेज व अन्य तांत्रिक गोष्टीच्या आधारे बाणेर पोलिसांनी आरोपीचा शोध लावला.
अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त सोमय मुंढे, सहायक पोलिस आयुक्त विठ्ठल दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली बाणेर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक द्रशेखर सावंत, सहायक पोलिस निरीक्षक के. बी. डोबेराव, उपनिरीक्षक संदेश माने, अमंलदार बाबा आहेर, किसन शिंगे, आप्पा गायकवाड, संदेश निकाळजे, अतुल इंगळे, गजानन अवातरिक, प्रदिप खरात, प्रितम निकाळजे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याचावर कोंढवा पोलिस ठाण्यात एटीएम फोडल्याचा व निगडी पोलिस ठाण्यात लुटमारीचा गुन्हा दाखल आहे. आमच्या पथकाने तब्बल 350 सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून व तांत्रिक विश्लेषण केले. त्या आधारे तो पुन्हा अशाच प्रकारे बाणेर परिसरात चोरी करण्याच्या तयारीत असताना गाडीसह त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याला याप्रकरणी अटक केली आहे. प्राथमिक तपासात तो परराज्यातील कामगारांना एटीएममधून पैसे काढत असताना हेरत असल्याचे समोर आले आहे.
चंद्रशेखर सावंत, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, बाणेर