

खडकवासला : आठ दिवसांपासून पडत असलेल्या सततच्या अवकाळी पावसामुळे भात पिकांचे आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजगड, हवेलीसह मोसे- मुठा खोऱ्यातील दहा हजार हेक्टर क्षेत्रातील भातपिके धोक्यात आली आहेत. सततच्या पावसामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.(Latest Pune News)
भात पिकांची कापणीही ठप्प पडली आहे. कापणीला आलेली पिके जोरदार पावसामुळे जमीनदोस्त होत आहेत, तर अनेक ठिकाणी कापणी केलेली पिके भिजून वाया गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार आहे. ऐन दिवाळीत सोमवार (दि.20) पासून घाटमाथ्यासह लगतच्या राजगड तालुका, मोसे, मुठा खोऱ्यासह सिंहगड, हवेलीत दररोज अवकाळी पाऊस कोसळत आहे. रविवारी (दि.26) दुपारपासून सायंकाळी उशिरापर्यंत सिंहगड, पानशेत, वरसगाव खोऱ्याला जोरदार अवकाळी पाऊस पडत होता. डोंगरी पट्ट्यातील मावळी शेतकऱ्यांचे पिवळं सोनं म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भात पिकांची कापणी सततच्या पावसामुळे आठ दिवसांपासून ठप्प पडली आहे.
यंदा राजगड तालुक्यात पाच हजार 300, हवेलीत तीन हजार 200 तर मोसे मुठा खोऱ्यात एक हजार 500 हेक्टर असे जवळपास दहा हजार हेक्टर क्षेत्रात भात पिकांची लागवड करण्यात आली आहे.
मान्सून सुरू होण्यापूर्वी 15 मे पासून काही दिवसांचा अपवाद वगळता पाऊस कोसळत आहे. मान्सून संपला तरी पाऊस थांबवण्याचे नाव घेत नाही, असे चित्र आहे. मंगळवारी (दि.21) पडलेल्या जोरदार अवकाळी पावसामुळे या भागात कापणी केलेल्या तसेच उभ्या भात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. खाचरांमध्ये पाणी साचल्याने पिके कुजण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
तालुक्यातील 5 हजार 300 हेक्टरपैकी जवळपास 90 टक्के क्षेत्रावर इंद्रायणी जातीची भात पिके आहेत. बहुतेक पिके कापणीस आली आहेत. करपा व इतर रोगांमुळे पिकांचे नुकसान झाले आहे, असे असले तरी पोषक वातावरण व पावसामुळे भातपिके जोमदार वाढून त्यांच्यात चांगल्याप्रकारे दाणे भरले आहेत. त्यामुळे यंदा चांगले उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. मात्र, सततच्या अवकाळी पावसामुळे भात पिकांची कापणी थांबली आहे. पावसामुळे शेतकऱ्यांनी पिकांची कापणी करू नये.
सुनील ईडोळे पाटील, कृषी अधिकारी, राजगड तालुका
कापणी न केल्याने भात पिके पावसामुळे भात खाचरात आडवी पडत आहेत. त्यामुळे दाण्यात पाणी शिरून कोंब फुटू लागले आहेत. येत्या दोन-तीन दिवसांत पावसाने उघडीप न दिल्यास पिकांचे मोठे नुकसान होणार आहे.
लक्ष्मण दारवटकर, शेतकरी, मोगरवाडी सिंहगड पायथा
ओढे-नाले पुन्हा प्रवाहित
सिंहगडसह पश्चिम हवेली तालुक्यातील गोऱ्हे, डोणजे, खानापूर, मांडवी, मोगरवाडी, आंबी, खामगाव मावळ, वरदाडे, मालखेड, आंबी, सोनापूर आदी गावांत तसेच राजगडमधील कोंडगाव, पाबे, दापोडे, निगडे मोसे, ओसाडे, तोरणा, वेल्हे, औत्रोली, रुळे, कुरण, पानशेत, वरसगाव परिसरासह मोसे मुठा खोऱ्यात अवकाळी पावसामुळे ओढे- नाले पुन्हा प्रवाहित झाले आहेत. भात खाचरे तुडुंब भरली आहेत. कापणीस आलेली पिके कुजण्याची शक्यता आहे, त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
डोंगरी पट्ट्यातील भातपिके ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच काढणीस आली आहेत. मात्र, रोजच्या पावसामुळे डोळ्यांसमोर पिकांचे नुकसान सुरू आहे. ऊन नसल्याने पिकांची कापणीही करता येत नाही.
लालासाहेब पासलकर, शेतकरी, तव, वरसगाव धरण भाग